

मुंबई : टाटा ट्रस्टने ‘टाटा सन्स’ आणि तिच्या संचालकांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या कायदेशीर कारवाईद्वारे १७ सप्टेंबर रोजी झालेल्या टाटा सन्सच्या मागील संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयांना आव्हान देण्यात आले आहे. त्यात एन. चंद्रशेखरन यांच्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा केलेल्या निवडीविरोधातही न्यायालयात दाद मागितली आहे.
कंपनीच्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मधील कलम १२१ चा संदर्भ देण्यात आला असून, १७ सप्टेंबर रोजी या कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील मुख्य अजेंडा म्हणजे कंपनीला शेअर बाजारात सूचिबद्ध (लिस्टिंग) करण्याचा प्रस्ताव आहे.
न्यायालयात जाण्याचा निर्णय ‘टाटा सन्स’च्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मधील कलम १२१ कडे लक्ष वेधतो. या कलमानुसार, ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळाने बहुमताने घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी, कलम १०४ बी अंतर्गत नियुक्त केलेल्या आणि बैठकीला उपस्थित असलेल्या संचालकांपैकी बहुसंख्यकांची संमती आवश्यक असते.
या प्रकरणात नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन हे दोन असे संचालक आहेत ज्यांनी १७ सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत, २० फेब्रुवारी २०२७ रोजी संपणारा चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांना पुन्हा पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मतदानासाठी ठेवला होता.
या प्रस्तावाच्या विरोधात नोएल टाटा यांनी, तर बाजूने वेणू श्रीनिवासन यांनी मतदान केले. या विषयाच्या चर्चेदरम्यान अध्यक्ष स्थान भूषवणारे स्वतंत्र संचालक हरीश मानवाणी यांनी, हे दोन नामनिर्देशित संचालक समान मतांवर विभागले गेल्याचे मानून, चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या बाजूने आपले निर्णायक मत (कास्टिंग व्होट) दिले होते.