भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि. १२) तेजीत सुरुवात केली. (Pudhari Photo)
अर्थभान

Stock Market Updates | शस्त्रसंधीनंतर बाजाराची जोरदार उसळी, सेन्सेक्स २,२०० अंकांनी वाढला, Nifty २४,७०० पार

कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी, जाणून घ्या आजचे मार्केट

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Updates

मुंबई : भारत- पाक शस्त्रसंधीनंतर सीमेवरील परिस्थिती काही प्रमाणात सामान्य झाली. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि.१२) जोरदार उसळी घेतली. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २,२०० अंकांनी वाढून ८१,७०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६५० हून अधिक अंकांनी वाढून २४,७०० पार झाला. मुख्यतः मिडकॅप शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात, भारत- पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील व्यवहार एका मर्यादेत राहिला होता. पण दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीनंतर बाजारात बंपर तेजी आली. शस्त्रसंधीच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. दरम्यान, आज निफ्टी फार्मा निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी वाढ नोंदवली.

आजच्या सुरुवातीच्या जोरदार तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात काही क्षणात १०.५ लाख कोटींची वाढ झाली.

कोणते शेअर्स टॉप गेनर्स?

बीएसई सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स आणि ॲक्सिस बँक हे शेअर्स प्रत्येकी ४ टक्के वाढले आहेत. त्याचबरोबर इटर्नल, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एलटी, पॉवर ग्रिड, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँक हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर दुसरीकडे सन फार्माचा शेअर्स ४.७ टक्के घसरला.

परदेशी गुंतवणूकदारांचा सलग १६ सत्रांत खरेदीवर जार राहिला. त्यानंतर ९ मे रोजी ते विक्रीकडे वळले. त्यांनी या दिवशी ३,७९९ कोटी रुपयांच्या देशांतर्गत शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ७,२७८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

सीमेवर परिस्थिती सामान्य

भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी झालेल्या शस्त्रसंधीच्या काही तासांतच पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केले. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी पाक रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला. याची गंभीर घेत भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. जर पाकिस्तानने आगळीक केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. सध्या सीमेवर परिस्थिती सामान्य होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात तैजीचा माहौल तयार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT