

Share Market :
जागतिक अथवा प्रादेशिक युद्धजन्य परिस्थिती ही फक्त सैनिकांच्या सीमेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती अर्थव्यवस्था, वित्तीय बाजारपेठा आणि सामान्य गुंतवणूकदारांवरही खोल परिणाम करते. युद्धाच्या छायेत गुंतवणूकदारांनी अधिक जागरूक, माहितीपूर्ण आणि दूरद़ृष्टी असलेली भूमिका घ्यावी लागते.
युद्धजन्य काळात शेअर बाजार, कमोडिटी बाजार आणि चलन बाजार यामध्ये प्रचंड चढ-उतार दिसून येतात. उदाहरणार्थ, युद्धग्रस्त देशातील शेअर बाजार कोसळतो, तर संरक्षण उद्योगातील किंवा नैसर्गिक संसाधनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स वाढू शकतात. अशावेळी, गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करणे गरजेचे ठरते.
गुंतवणूकशास्त्रात युद्धाला ‘हाय रिस्क कंडिशन’ म्हणतात. अशा काळात गुंतवणुकीतील धोका कमी करण्यासाठी काय करायला हवे?
सर्वांत पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व गुंतवणूक एकाच क्षेत्रात न करता विविध क्षेत्रांत विभागावी.
इक्विटी, म्युच्युअल फंडस्, सोने, चांदी, सरकारी बाँडस्, रिअल इस्टेट, स्विस फ्रँक यांसारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक विभागल्यास युद्धकाळातील चढ-उतारांची एकत्रित झळ बसणार नाही. कारण, यातील प्रत्येकावर होणारे परिणाम हे विषम स्वरुपाचे असतात.
युद्धामुळे महागाई वाढते, व्याजदर बदलतात, पुरवठा साखळी विस्कळीत होते. या सर्वांचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर, अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरावर होतो. अशावेळी ‘मॅक्रो इकॉनॉमिक ट्रेंड्स’चा अभ्यास करून, कोणती मालमत्ता धोक्याच्या बाहेर आहे हे ठरवावे.
युद्धाच्या बातम्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होते; पण गुंतवणूक ही भावनांवर नव्हे तर विश्लेषणावर आधारित असावी. बाजार पडत असताना घाबरून विक्री करणे किंवा तेजीच्या आशेवर अति गुंतवणूक करणे टाळणे, हे यशस्वी ट्रेडर्सचे आणि गुंतवणूकदाराचे पहिले लक्षण आहे.
संभाव्य शांतता चर्चा, युद्धाचे क्षेत्र, सामील राष्ट्रांची आर्थिक क्षमता यांचा अभ्यास करून पुढील आर्थिक घडामोडींचा अंदाज घ्यावा. तसेच पोर्टफोलिओ पुन्हा संतुलित करावा. आकस्मिक गरजांसाठी रोख राखीव जवळ ठेवावी.
एकूणच, युद्धजन्य परिस्थितीत माहितीपूर्ण निर्णय, धोका व्यवस्थापन आणि दीर्घकालीन द़ृष्टिकोन यांच्या साहाय्याने गुंतवणूकदार अशा संकटकाळातही सुरक्षितपणे मार्ग काढू शकतात. बाजारपेठेतील गोंधळात संयम राखणे आणि पुरेशा माहितीवर आधारित कृती करणे हेच खरे कौशल्य आहे.
युद्ध ही तात्पुरती परिस्थिती असते. त्यामुळे बहुतेकदा दीर्घकालीन गुंतवणुकीवर तिचा मर्यादित परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक चालू ठेवणे उपयुक्त ठरते. विशेषतः जर त्या कंपन्या युद्धोत्तर पुनर्रचनेत सहभागी होण्याची शक्यता असेल तर त्यांचा विचार जरूर करावा. युद्धजन्य स्थितीत काही गुंतवणूकदार अशा कंपन्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात, ज्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे युद्धाभिमुख उद्योगांशी संबंधित असतात. अशावेळी ईएसजी म्हणजेच एन्व्हार्नमेंटल, सोशल, गर्व्हनन्स गुंतवणुकीचे महत्त्व वाढते.