Stock Market Updates
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी चढ-उतार दिसून आला. भारत- पाकिस्तानदरम्यान वाढता तणाव आणि जागतिक स्तरावरील व्यापार युद्धामुळे महागाई आणि बेरोजगारीच्या वाढत्या जोखमींबद्दल अमेरिकच्या फेडरल रिझर्व्हने चिंता व्यक्त केली आहे. पण याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीत खुले झाले. पण ते काही वेळातच सपाट झाले.
सेन्सेक्स १२५ अंकांच्या वाढीसह खुला झाला. तर निफ्टी ५० निर्देशांकाने २५ अंकांच्या किरकोळ वाढीसह सुरुवात केली. पण काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर आले. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ८० अंकांच्या घसरणीसह ८०,६९५ वर तर निफ्टी ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,३८० जवळ व्यवहार करत होता.
स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. बीएसई स्मॉलकॅप १ टक्के वाढून व्यवहार करत आहे.
टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, एसबीआय, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर Eternal, आयटीसी, मारुती, एम अँड एम, सन फार्मा, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले.
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.७) चढ-उतार दिसून आला होता. आजही गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली.
जागतिक स्तरावर व्यापार युद्धाच्या तीव्रतेने निर्माण झालेली अनिश्चितता, मंदावलेली आर्थिक वाढ आणि अस्थिर महागाई पाहता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी त्यांचा प्रमुख बेंचमार्क व्याजदर ४.२५ टक्के ते ४.५ टक्क्यांच्या श्रेणीत जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी राहिली. तर फेडच्या निर्णयानंतर आशियाईतील शेअर बाजारांनी सावध सुरुवात केली.