Stock Market Updates
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचे पडसाद शुक्रवारी (दि.९) भारतीय शेअर बाजारात उमटले. बेंचमार्क इक्विटी निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह खुले झाले. सर्वच सेक्टर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. सकाळी ११.२० वाजता सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ७९,५३० वर आणि निफ्टी २६२ अंकांनी घसरून २४ हजारांवर व्यवहार करत होता.
दरम्यान, गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने हाणून पाडल्यानंतर जम्मूमध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली आहे. परिणामी बाजारात घसरण दिसून आली.
सध्याच्या तणावामुळे बाजारता अस्थिरता दिसून आली आहे. दरम्यान, बाजारातील भयसूचकांक इंडिया VIX निर्देशांक ७ टक्क्यांनी वाढून २२.६५ वर गेला.
सर्व सेक्टर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. निफ्टी मेटल, रियल्टी आणि बँकिंग निर्देशांकांत सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. निफ्टी बँक, एफएमसीजी, मीडिया, मेटल आणि रियल्टी निर्देशांक १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर बीएसई मिडकॅप १.४ टक्के आणि स्मॉलकॅप १.९ टक्के घसरला.
सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, इटर्नल, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर टायटनचा शेअर्स ४ टक्के वाढून टॉप गेनर ठरला आहे. एलटी शेअर्स ३.५ टक्के आणि टाटा मोटर्सचा शेअर्स २.८ टक्के वाढला आहे.
सध्या भू-राजकीय तणाव असूनही परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ कायम आहे. त्यांनी १६ सत्रांत सुमारे ४७ हजार कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली आहे.