Stock Market Sensex and Nifty
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स ५७ अंकांच्या वाढीसह ८०,५९७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ११ अंकांनी वाढून २४,६३१ वर स्थिरावला.
आशियाई बाजारीतील वाढीमुळे आजच्या सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी दर्शवली होती. पण, युक्रेनमधील संघर्षावरील रशिया-अमेरिका चर्चेपूर्वी गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगली. यामुळे बाजारातील वाढ नियंत्रणात राहिल्याचे दिसून आले.
सेन्सेक्सवर इटरनल, इन्फोसिस, एशियन पेंट्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. त्याचबरोबर टायटन, एचडीएफसी बँक, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, मारुती, आयसीआयसीआय बँक हे शेअर्सही तेजीत राहिले.
तर दुसरीकडे टाटा स्टीलचा शेअर्स ३ टक्के घसरला. टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, रिलायन्स, आयटीसी हे शेअर्सही घसरले.
FMCG निर्देशांक वगळता, इतर सर्व प्रमुख सेक्टरल निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी एफएमसीजी ०.६ टक्के घसरला. ब्रॉडर मार्केटमध्येही विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप (BSE MidCap) ०.१ टक्के स्मॉलकॅप ०.६ टक्के घसरला.
अमेरिकेतील महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये वाढ दिसून आली.