Stock Market Crash Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण; वीकली एक्सपायरीच्या दिवशी गुंतवणूकदार सावध, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: 2026च्या पहिल्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीसह झाली. ऑयल अँड गॅस शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली.

Rahul Shelke

Stock Market Today: शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात झाली. 2026 मधील पहिल्या वीकली एक्सपायरीच्या दिवशीच गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. बाजार उघडताच सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही सुरुवातीपासूनच दबावात होता.

सकाळी सुमारे 9.25 वाजता सेन्सेक्स 330 अंकांनी घसरून 85,117 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 57 अंकांनी घसरून 26,186 च्या आसपास होता. मात्र, बँकिंग शेअर्समध्ये थोडी वाढ दिसून आली आणि बँक निफ्टी 99 अंकांनी वाढून 60,143 वर पोहोचला. बाजारातील अस्थिरतेचं द्योतक मानला जाणारा India VIX सुमारे 1.8 टक्क्यांनी वाढला, त्यामुळे दिवसभर चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

ऑयल अँड गॅस शेअर्सवर मोठा दबाव

आजच्या व्यवहारात ऑयल अँड गॅस सेक्टरमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली. हा सेक्टोरल निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरला. ONGC मध्ये किरकोळ वाढ वगळता जवळपास सर्वच शेअर्स लाल रंगात होते. रिलायन्स, MGL, गुजरात गॅस, BPCL, GAIL, IOC आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. याशिवाय FMCG, ऑटो, रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स हे सेक्टरही दबावाखाली होते.

कुठल्या सेक्टरमध्ये तेजी?

दुसरीकडे, मेटल सेक्टरमध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ दिसून आली. तसेच PSU बँका, NBFC, IT, फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्समध्ये खरेदीचा कल होता. निफ्टी 50 मध्ये Hindalco, Apollo Hospitals, ICICI Bank, HDFC Life, Bajaj Auto, Bajaj Finserv आणि ONGC हे टॉप गेनर्स ठरले. तर Trent, Reliance, HDFC Bank, Adani Ports, Nestle आणि ITC हे टॉप लूजर्समध्ये होते.

अमेरिकन बाजारांकडून मजबूत संकेत

व्हेनेझुएला सारख्या मोठ्या जिओपॉलिटिकल घडामोडी असूनही अमेरिकन शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. डाओ जोंस 600 अंकांच्या वाढीसह नव्या उच्चांकावर बंद झाला, तर सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर नॅस्डॅकही सुमारे 160 अंकांनी वाढला. मात्र, डाओ फ्युचर्स सध्या काहीसे सुस्त असल्याने पुढील सत्रात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

GIFT निफ्टीकडून सकारात्मक संकेत

देशांतर्गत बाजारासाठी GIFT निफ्टीकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. तो सुमारे 70 अंकांच्या वाढीसह 26,400 च्या आसपास व्यवहार करत असल्याने बाजारात पुढे रिकव्हरीचा प्रयत्न होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र, वीकली एक्सपायरीमुळे अस्थिरता कायम राहू शकते.

सोने-चांदीत जोरदार वाढ

जिओपॉलिटिकल तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या आणि चांदीला मोठी मागणी आहे. देशांतर्गत बाजारात सोने सुमारे 2,400 रुपयांनी वाढून 1 लाख 38 हजार 100 रुपयांच्या वर, तर चांदी 9,800 रुपयांनी वाढून 2 लाख 46 हजार 100 रुपयांच्या पुढे गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं 120 डॉलरने, तर चांदीत सुमारे 8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

कमोडिटी मार्केटमध्ये हालचाल

बेस मेटल्समध्येही तेजी होती. कॉपर प्रथमच 13,000 डॉलरच्या वर, अ‍ॅल्युमिनियम चार वर्षांच्या उच्चांकावर, तर निकेल 16 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. दरम्यान, कच्च्या तेलात मोठी हालचाल दिसून आली. ब्रेंट क्रूड काही काळ 60 डॉलरच्या खाली घसरल्यानंतर पुन्हा सावरत सुमारे 62 डॉलरच्या आसपास बंद झाला.

एकंदरीत, आजच्या बाजारावर जिओपॉलिटिकल घडामोडी, कमोडिटी दर, वीकली एक्सपायरी आणि सेक्टोरल हालचाली यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT