Goa Suchana Seth Case | आईच काळ ठरली! चार वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येने देश हादरवणाऱ्या सूचना सेठ प्रकरणाला दोन वर्षे

Goa Suchana Seth Case | पोटच्या मुलाचा गळा घोटल्याचा सूचना सेठवर संशय : अजूनही येतात अंगावर शहारे...
goa suchana seth
goa suchana seth
Published on
Updated on

पणजी : प्रभाकर धुरी

चार वर्षांच्या पोटच्या मुलाला संपवल्याचा आरोप असणाऱ्या सूचना सेठ या निर्दयी आईच्या देशाला हादरवून सोडणाऱ्या मर्डर मिस्ट्रीला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या सूचना सेठ ही कारागृहात असून ही घटना अजूनही अंगावर शहारे आणते.

आई या शब्दात अवघ्या विश्वाची ममता सामावलेली असते. आईची थोरवी वर्णन करताना अनेक ग्रंथांचे खंडच्या खंड भरून गेले आहेत. भविष्यातही युगानुयुगे आईची थोरवी गायली जाईल. पण, कधी कधी एखादी आई अशी निपजते की, ती आपल्या कर्मांनी आपल्या आईपणालाच बट्टा लावून जाते. लेकराला ठेच लागली तर जिच्या काळजातून वेदना उमटतात, ती आई कुठे आणि आपल्याच लेकराचा गळा घोटणारी शिकली-सवरलेली निर्दयी कुठे?

goa suchana seth
Defence Minister Rajnath Singh| वाकड्या नजरेने पाहाल, तर नकाशा बदलून टाकू

शिक्षणाने माणूस सुसंस्कृत बनतो, या परंपरागत समाजधारणेला छेद देणारी ही हृदयद्रावक घटना घडली ती गोव्यासारख्या देवभूमीत. वडिलांसारखे दिसणे जीवावर उठले; चिमुकला चिन्मय हा दिसायला हुबेहूब आपल्या बापासारखा, व्यंकटरमणसारखा होता. त्यामुळे चिन्मयला पाहिले की, सूचनाला नेमकी व्यंकटरमणची आठवण व्हायची. ज्याचे नाव नको म्हणून घटस्फोट मागितला, त्याच व्यंकटरमणचा चेहरा तिला चिन्मयच्या रूपाने समोर यायचा आणि तिची धुसफूस व्हायची. त्यामुळे काहीही करून पिता-पुत्रांची कायमची ताटातूट करण्यासाठी सूचनाने कारस्थान रचायला सुरुवात केली. मनात सूडभावनेचा सैतान शिरलेल्या सूचनाने एक भयंकरच घाट घातला होता.

७ जानेवारी रोजी व्यंकटरमण चिन्मयला भेटायला बंगळुरू येथे गेला होता. मात्र, त्यापूर्वीच शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४ रोजी ती चिन्मयला घेऊन गोव्यात आली. ती बंगळुरूहून विमानाने मोपा विमानतळावर आली. तिथून तिला पोळे येथे जायचे होते. मात्र, तिथली सर्व हॉटेल्स फुल असल्याने तिने रात्री ११.३० वाजता सिकेरी, कांदोळी येथील एका गेस्ट हाऊसमधील ४०४ क्रमांकाची खोली बुक केली. तिने १० जानेवारीपर्यंत बुकिंग केले होते.

आईबरोबर गोव्यात आलेल्या चिन्मयला काय माहीत की, आईच्या रूपाने काळच त्याच्या बरोबर वावरतोय! निरागस चिन्मय तिच्या कुशीत निर्धास्त झोपला होता; पण त्याची ही निद्रा चिरनिद्रा ठरली. अतिशय थंड डोक्याने सूचना नावाच्या या निर्दयी मातेने आपल्याच कुशीत झोपलेल्या पोटच्या लेकराचा गळा घोटला आणि नवऱ्यावर सूड उगवल्याचा संशय सूचना सेठ हिच्यावर आहे.

या घटनेनंतर तिने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिसांना एक फाटलेला टिश्यू पेपर मिळाला. त्यावर तिने लिहिले होते की, मला मुलाला पतीच्या ताब्यात द्यायचे नव्हते. तिला न्यायालय मुलाचा ताबा पतीकडे देईल, याची भीती वाटत होती.

निर्विकार चेहऱ्याने सोडले हॉटेल

चिन्मयचा खून केल्यानंतर अतिशय निर्विकार चेहऱ्याने संशयित सूचना हिने हॉटेल सोडले आणि एका टॅक्सीतून बंगळुरूची वाट धरली. बंगळुरूला जाण्यासाठी विमानाऐवजी टॅक्सीने जात असल्याबद्दल हॉटेल कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. मात्र, तिने टॅक्सीचाच आग्रह धरला आणि ३० हजार रुपये भाडे देऊन रविवार, दि. ७ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास तिने हॉटेल सोडले.

टॅक्सीचालक रॉय जॉन डिसोझा याला सुटकेस खूप जड वाटली म्हणून त्याने काही सामान बाहेर काढूया का, असे विचारले असता तिने नकार दिला. कारण, चिन्मयचा मृतदेह तिने आपल्या सोबतच्या त्या बॅगेत ठेवला होता.

इकडे दिवसभर मुलाची वाट पाहूनही त्याची भेट न मिळाल्याने व्यंकटरमण जकार्ताला निघून गेला होता. दरम्यान, सूचना गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, तिथला बटलर देवाशिष माझी सकाळी ती खोली साफ करण्यासाठी गेला असता, त्याला खोलीत रक्ताचे डाग दिसले. त्यावरून हॉटेल व्यवस्थापक गगन गंभीर यांनी पोलिसांना बोलावले. पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी परेश नाईक तातडीने हॉटेलवर आले.

सीसीटीव्हीमध्ये सूचना हॉटेलमध्ये मुलासह येताना दिसत होती; मात्र, जाताना मुलगा सोबत नव्हता, तर केवळ सुटकेस होती. घटनेचे गांभीर्य ओळखून नाईक यांनी सूचना ज्या टॅक्सीने निघाली होती, त्या टॅक्सी चालकाचा माग काढला. त्या टॅक्सी चालकाशी कोकणीमध्ये बोलत सूचनासोबत मुलगा आहे का, असे विचारले; पण त्याने नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे त्यांना संशय आला.

त्यांनी चिन्मयच्या खुनाची शक्यता वर्तवून त्या टॅक्सी चालकाला टॅक्सी नजीकच्या पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. चालकाने आयमंगल (चित्रदुर्ग, कर्नाटक) येथील पोलिस स्टेशनमध्ये टॅक्सी नेली. तिथले पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार यांनी सूचनाचे सामान तपासले असता बॅगेत तिच्या मुलाचा, चिन्मयचा मृतदेह आढळला आणि थंड डोक्याने आईनेच केलेल्या मुलाच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला.

केवळ पिता-पुत्राची ताटातूट करण्याच्या सूडभावनेतून सूचना सेठ हिने स्वतःच्या चार वर्षांच्या मुलाचा खून केला आणि गोव्यासह देशही हादरून गेला. मात्र, आपण खून केलेला नाही, मला झोप लागण्यापूर्वी तो जिवंत होता आणि मी झोपेतून उठले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता, असा कांगावा करून तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, कारण शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले होते. चिन्मयचे तोंड आणि कान सुजले होते, तसेच नाकातून रक्तही आले होते. हिरापूर, कर्नाटक येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार नाईक यांनी शवविच्छेदन केले होते.

पोलिसांनी तिला खुनाच्या आरोपाखाली मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ रोजी अटक केली. यावेळी पोलिसांनी जकार्ताहून आलेल्या व्यंकटरमण यांची जबानी घेतली. त्यांनी १० जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये चिन्मयवर अंत्यसंस्कार केले. “आपल्या वादात चिमुकल्या चिन्मयचा बळी घेऊन तुला काय मिळाले?” हा प्रश्न जेव्हा व्यंकटरमण यांनी सूचनाला विचारला, तेव्हा पोलिसही निशब्द झाले होते.

कारागृहात महिला पोलिसाला मारहाण

सध्या संशयित सूचना सेठ कोलबाळ येथील मध्यवर्ती कारागृहात अंडरट्रायल आहे. या ठिकाणी तिच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास परवानगीशिवाय रजिस्टर घेतल्याने एका महिला पोलिस उपनिरीक्षकांनी तिला विचारणा केली असता तिने त्यांना शिवीगाळ करत केसांना धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे या कलमांखाली तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूचना-व्यंकटरमणचे लग्न ते घटस्फोटाचा अर्ज

सूचना आणि व्यंकटरमण यांची २००८ साली बंगळुरूमध्ये भेट झाली. व्यंकटरमण मूळचा केरळचा आहे. दोघेही उच्चशिक्षित होते. त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी कोलकाता येथे २०१० साली प्रेमविवाह केला. सूचना बंगळुरूमध्ये राहत होती, तर व्यंकटरमण नोकरीनिमित्त जकार्ता (इंडोनेशिया) येथे राहत होता. त्यालाही वर्षाला कोट्यवधी रुपयांचे पॅकेज मिळत असे. सूचनाही तिच्या बुद्धिमत्तेच्या आणि व्यवसायाच्या जोरावर कोट्यवधी रुपये कमावत होती.

लग्नानंतर नऊ वर्षांनी, २०१९ मध्ये सूचना आणि व्यंकटरमणचा मुलगा चिन्मयचा जन्म झाला. दरम्यानच्या काळात दोन वर्षे सूचना अमेरिकेला गेली होती. ती अमेरिकेतून परतल्यानंतर २०२० मध्ये सूचना आणि व्यंकटरमणमध्ये वाद सुरू झाले आणि प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत गेले. न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती; मात्र, मुलाच्या आठवणीने व्यंकटरमणचा कंठ दाटून यायचा. त्यामुळे त्याने न्यायालयाच्या माध्यमातून मुलाच्या भेटीची परवानगी मिळवली.

न्यायालयाच्या आदेशानुसार व्यंकटरमण दर रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मुलगा चिन्मयला भेटू लागला. मुलाच्या भेटीच्या ओढीने तो जकार्ताहून दर रविवारी बंगळुरूमध्ये येत असे. दिवसभर बाप-लेकांचे हितगुज, हसणे-बागडणे चालायचे. त्या दोघांची शेवटची भेट १० डिसेंबर २०२३ रोजी झाली होती. त्यानंतर मात्र सूचनाने पतीला चिन्मयला भेटू दिले नव्हते.

goa suchana seth
Goa Vegetable Market | नववर्षात गावठी वांग्यांचीच चलती; 160 रुपये नग तरीही मागणी प्रचंड

सूचना सेठ कोण होती?

संशयित सूचना सेठ ही पश्चिम बंगालमधील एक उच्च विद्याविभूषित तरुणी होती. तिने वेगवेगळ्या विषयांत मिळवलेले ज्ञान भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारे होते. संस्कृत आणि भौतिकशास्त्राची पदवीधर असलेल्या या तरुणीने अनेक क्षेत्रांत प्रावीण्य मिळवले होते. एक-दोन नव्हे तर तब्बल चार भाषांमध्ये ती पारंगत होती.

स्टार्टअप आणि उद्योग संशोधन प्रयोगशाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढणारी कंपनी तिने बंगळुरूमध्ये स्थापन केली होती. तिच्याकडे आर्टिफिशियल लँग्वेज, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग व टेक्स्ट माइनिंग या क्षेत्रांतील कामाचे चार अमेरिकन पेटंट्स होते. ती तिच्या स्वतःच्या स्टार्टअप कंपनीची सीईओ, तसेच इंटेलिजन्स एथिक्स एक्स्पर्ट व डेटा सायंटिस्ट होती. २०२१ साली एआय एथिक्समध्ये १०० प्रतिभावान महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला होता.

हे ठरू शकतात महत्त्वाचे साक्षीदार

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ५९ जणांच्या जबान्या नोंदवल्या आहेत, तर न्यायालयात ६४२ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात देवाशिष माझी (रूम अटेंडंट), गगन गंभीर (हॉटेल व्यवस्थापक), परेश नाईक (तपास अधिकारी), रॉय जॉन डिसोझा (सूचनाला गोव्यातून बंगळुरूला नेणारा टॅक्सी चालक), शिवकुमार (टॅक्सीतील सुटकेस व बॅगेची तपासणी करणारे कर्नाटक पोलिस उपनिरीक्षक) आणि डॉ. कुमार नाईक (चिन्मयचे शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी) यांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.

दोघांची साक्ष पूर्ण…

या प्रकरणात एकूण ५९ साक्षीदार आहेत. त्यातील दोघांची साक्ष पूर्ण झाली आहे, तर तिसऱ्याची साक्ष सुरू आहे. सूचना सेठ हिने हॉटेल सोडल्यानंतर पोलिसांना फोन करून बोलावणारे हॉटेल व्यवस्थापक गगन गंभीर आणि टॅक्सी चालक रॉय डिसोझा यांची साक्ष पूर्ण झाली आहे. रॉयसोबत बंगळुरूला टॅक्सीतून गेलेल्या त्याच्या सहकाऱ्याची साक्ष सध्या सुरू आहे.

पिता-पुत्राची भेट टाळण्यासाठी आटापिटा

मुलाची हत्या करण्यापूर्वी सूचना सेठ आणखी एकदा गोव्यात येऊन गेली होती. ती नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवार, दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी गोव्यात येऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली होती. गोव्यातून ती ४ जानेवारी रोजी बंगळुरूला गेली आणि पुन्हा ६ जानेवारी २०२४ रोजी गोव्यात कांदोळी येथे आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार दर रविवारी मुलाची व वडिलांची भेट निश्चित होती. मात्र, ती होऊ नये, असा तिचा प्रयत्न असायचा, असे व्यंकटरमण यांच्या वकिलाने सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news