Stock Market Today Updates
शेअर बाजारात बुधवारी (दि. ३० जुलै) चढ-उतार दिसून आला. दरम्यान, सेन्सेक्स १४३ अंकांनी वधारुन ८१,४८१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३३ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,८५५ वर स्थिरावला. विशेषतः पहिल्या तिमाहीतील दमदार कमाईच्या जोरावर लार्सन अँड टुब्रोचा शेअर्स तुफान तेजीत राहिला. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावण्यास मदत झाली.
आज क्षेत्रीय निर्देशांकात अस्थिरता राहिली. रियल्टी निर्देशांकात जवळपास १ टक्के घसरण झाली. तर दुसरीकडे आयटी आणि फार्मा निर्देशांक तेजीत बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. ऑटो, FMCG वरही दबाव राहिला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी आणि टॅरिफबाबत दिलेल्या १ ऑगस्टच्या डेडलाईनपूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसून आले. परिणामी, बाजारातील तेजी मर्यादित राहिली.
सेन्सेक्सवर Larsen & Toubro चा शेअर्स ४.८ टक्के वाढला. त्याचबरोबर सन फार्मा, एनटीपीसी, मारुती हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले. भारती एअरटेल, ट्रेंट, ॲक्सिस बँक, एम अँड एम, एशियन पेंट्स हे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले. तर दुसरीकडे टाटा मोटर्सचा शेअर्स ३.४ टक्के घसरला. पॉवर ग्रिड, इटरनल, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक हे शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री कायम ठेवली आहे. एनएसईच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, २९ जुलै रोजी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारात ४,६३७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ६,१४७ कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ खरेदी केली.