Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरण; निफ्टी 23,000 वर, गुंतवणूकदारांची चिंता वाढली, आता पुढे काय होणार?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असून निफ्टी 23,035 आणि सेन्सेक्स 73,525 अंकांवर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. निफ्टी 28 अंकांनी घसरून 23,035 अंकांवर उघडला. तर सेन्सेक्स 55 अंकांच्या घसरणीसह 73,525 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात काहीशी रिकव्हरी दिसून आली असून निफ्टीने 23,100 अंकांची पातळी पुन्हा गाठण्याचा प्रयत्न केला.

याआधी गुरुवारी बाजारात मोठी घसरण झाली होती. निफ्टी तब्बल 383 अंकांनी घसरून 23,063 अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये 1,247 अंकांची मोठी घसरण होऊन तो 73,580 अंकांवर स्थिरावला.

कच्च्या तेलाच्या दरांवर बाजाराची नजर

जागतिक बाजारातील घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम आहे. कच्च्या तेलाचा दर सध्या 106 डॉलरच्या आसपास आहे. तेलाच्या वाढत्या किमती, बॉन्ड यील्डमधील वाढ आणि डॉलरची तेजी यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावध भूमिका पाहायला मिळत आहे.

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. दुसरीकडे आशियाई बाजारांमध्ये शुक्रवारी काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. जपानच्या निक्केई निर्देशांकात सुमारे 1.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरियाचा KOSPI बाजार बंद आहे.

जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरांवरही दबाव आहे. लंडन मेटल एक्स्चेंज अर्थात LME वर धातूंच्या किमतींमध्ये संमिश्र व्यवहार सुरू आहेत.

अमेरिका-इराण तणावावर बाजाराचे लक्ष

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचा परिणाम जागतिक बाजारांवर होत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पुन्हा खुला करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची भूमिका अशी आहे की इराणने आधी हॉर्मुजचा मार्ग खुला करावा. तर इराणकडून अमेरिकेने आधी नाकेबंदी हटवावी, अशी भूमिका मांडली जात असल्याचे वृत्त आहे.

दोन्ही बाजूंमध्ये तडजोडीच्या दिशेने हळूहळू पुढे जाण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या चर्चेतील पुढील घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

जागतिक बाजारातील संकेत

सध्या जागतिक बाजारातून भारतीय बाजारासाठी फारसे चांगले संकेत मिळत नाहीत. कच्चे तेल 106 डॉलरच्या आसपास असल्याने त्याचा दबाव कायम आहे.

अमेरिकेतील 10 वर्षांच्या बॉन्ड यील्डने 5.2 टक्क्यांची पातळी गाठली असून ती जवळपास 19 वर्षांच्या उच्चांकावर आहे. 30 वर्षांच्या बॉन्ड यील्डनेही 5.4 टक्क्यांची पातळी गाठली आहे. ही पातळी जवळपास 22 वर्षांतील उच्चांक असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, डॉलर इंडेक्स सलग चौथ्या दिवशी वाढला असून तो 101 च्या वर गेला आहे. दोन महिन्यांच्या उच्चांकाजवळ डॉलर पोहोचल्याने उदयोन्मुख बाजारांवर त्याचा दबाव निर्माण होऊ शकतो.

बाजाराला दिलासा मिळण्याची शक्यता?

जागतिक पातळीवर तणावाचे वातावरण असले तरी काही सकारात्मक संकेतही दिसत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होण्याची शक्यता ही बाजारासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते.

अमेरिकन बाजार गुरुवारी घसरले असले तरी ही घसरण तुलनेने मर्यादित होती. आशियाई बाजारांमध्येही शुक्रवारी काही प्रमाणात रिकव्हरी दिसत आहे.

डाओ आणि नॅस्डॅक फ्युचर्समध्ये मात्र फारशी हालचाल दिसत नाही. त्यामुळे भारतीय बाजारासाठी आज कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिका-इराणमधील घडामोडी हे महत्त्वाचे ट्रिगर ठरणार आहेत.

सध्या कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत अस्थिर आहेत. त्यामुळे तेलाचा दर 100 ते 110 डॉलरच्या पट्ट्यात कोणत्या दिशेने पुढे जातात, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर निफ्टी

HDFC Securities चे डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट नंदीश शाह यांच्या मते, गुरुवारी निफ्टी 383 अंकांनी घसरून 23,063 अंकांवर बंद झाला. 6 एप्रिलनंतरची ही निफ्टीची पाच महिन्यांतील सर्वात खालची क्लोजिंग पातळी ठरली.

केवळ मोठ्या कंपन्यांमध्येच नाही तर ब्रॉडर मार्केटमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. मिडकॅप निर्देशांकात 2.25 टक्क्यांची घसरण झाली. स्मॉलकॅपमध्ये 1.53 टक्के तर मायक्रोकॅपमध्ये 1.48 टक्क्यांची घसरण झाली.

निफ्टीसाठी आता कोणते स्तर महत्त्वाचे?

तांत्रिक विश्लेषणानुसार, निफ्टीसाठी आता 22,700 ही महत्त्वाची सपोर्ट पातळी मानली जात आहे. बाजारात रिकव्हरी झाल्यास 23,300 हा पहिला महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो.

निफ्टीने 23,300 ची पातळी पार केल्यास 23,500 ते 23,600 ही पुढील महत्त्वाची रेंज ठरू शकते. मात्र, या पट्ट्यात मजबूत विक्रीचा दबाव येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे आजच्या व्यवहारात 23,000 ची पातळी निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कच्च्या तेलाचे दर, अमेरिका-इराणमधील घडामोडी, डॉलर आणि अमेरिकन बॉन्ड यील्ड यांचा बाजाराच्या दिशेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT