Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात रिकव्हरी; सुरुवातीच्या तेजीने गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फायदा, आज नेमकं काय घडतंय?

Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली असून निफ्टी 64 अंकांनी वाढून 23,334 तर सेन्सेक्स 260 अंकांनी वाढून 74,575 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. निफ्टी 64 अंकांच्या वाढीसह 23,334 अंकांवर, तर सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 74,575 अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीने 23,350 च्या वर टिकून राहण्याचा प्रयत्न केला.

बाजारातील या सकारात्मक सुरुवातीमुळे बीएसईवर कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात मोठी वाढ झाली. सुरुवातीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹2 लाख कोटींपेक्षा अधिक वाढ झाली असून, बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सुमारे ₹478.2 लाख कोटी झाले.

क्रूड ऑइलच्या घसरणीचा बाजाराला आधार

भारतीय शेअर बाजारासाठी सध्या क्रूड ऑइलच्या किमतीतील घसरण हा महत्त्वाचा सकारात्मक घटक मानला जात आहे. क्रूड ऑइलची किंमत सध्या 104 डॉलरच्या आसपास आहे. क्रूडच्या किमती कमी झाल्यामुळे भारताच्या आयात खर्चावर आणि महागाईच्या दबावावर काही प्रमाणात सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन सत्रांपासून भारतीय बाजार हिरव्या रंगात पाहायला मिळत आहे. गुरुवारी निफ्टी 53 अंकांनी वाढून 23,270 वर बंद झाला होता. त्यामुळे शुक्रवारी बाजाराची क्लोजिंग कोणत्या पातळीवर होते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

ग्लोबल संकेतांमुळे बाजाराचा मूड सुधारला

HDFC Securitiesचे प्राइस रिसर्च प्रमुख देवर्ष वकील यांच्या मते, काल अमेरिकन बाजारात चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली. टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली, अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये नरमाई आली आणि क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या.

या सर्व घटकांमुळे जागतिक बाजारातील सेंटिमेंटमध्ये सुधारणा झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. मात्र, 23,360 हा निफ्टीसाठी महत्त्वाचा रेसिस्टन्स ठरू शकतो.

अमेरिकन शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी

गुरुवारी अमेरिकन बाजारात प्रमुख निर्देशांकांमध्ये वाढ झाली.

  • Nasdaq: 1.7% वाढ, सुमारे 440 अंकांची तेजी

  • S&P 500: 1.1% वाढ

  • Dow Jones: 0.6% वाढ

विशेषतः टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे अमेरिकन बाजाराला आधार मिळाला.

टाटा सन्सच्या निर्णयाकडेही बाजाराचे लक्ष

17 सप्टेंबर 2026 रोजी टाटा सन्सच्या बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांची एग्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून पुढील पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे.

या निर्णयामुळे टाटा सन्समधील भविष्यातील व्यवस्थापन आणि संभाव्य पब्लिक लिस्टिंगशी संबंधित घडामोडींवरही लक्ष केंद्रित झाले आहे. RBIच्या नियमांनुसार कंपनीच्या संभाव्य लिस्टिंगबाबतही प्रक्रिया पुढे नेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावर टाटा ट्रस्टकडून आक्षेप व्यक्त करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

निफ्टीसाठी कोणते लेव्हल महत्त्वाचे?

SAMCO Securitiesचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, निफ्टी गेल्या काही सत्रांपासून 23,116 ते 23,592 या रेंजमध्ये व्यवहार करत आहे. या रेंजमधून निर्णायक ब्रेकआउट झाल्यानंतर बाजाराची पुढील दिशा अधिक स्पष्ट होऊ शकते.

सध्या निफ्टीसाठी 23,100 हा महत्त्वाचा सपोर्ट मानला जात आहे. वरच्या बाजूला 23,400 आणि त्यानंतर 23,450 हे रेसिस्टन्स लेव्हल महत्त्वाचे आहेत.

आज बाजारासमोर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही संकेत

एकीकडे क्रूड ऑइलच्या किमतीतील घसरण, अमेरिकन बाजारातील तेजी आणि बॉन्ड यील्डमधील नरमाईचा आधार मिळत आहे. दुसरीकडे डॉलर इंडेक्स 100 च्या वर टिकून राहणे आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) विक्री बाजारासाठी दबाव निर्माण करणारे घटक आहेत.

याशिवाय अमेरिका-इराण तणावाशी संबंधित घडामोडी आणि इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफ लावण्याच्या चर्चेमुळेही जागतिक बाजारातील अनिश्चितता कायम आहे.

गुरुवारी बाजारात रिकव्हरी झाली असली तरी FIIsची विक्री सुरू राहणे हा बाजारासाठी चिंतेचा मुद्दा आहे. निफ्टीमध्ये तेजी असताना बँक निफ्टी तुलनेने कमकुवत राहिला, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली.

त्यामुळे आजच्या सत्रात बाजारात तेजीचे संकेत असले तरी पूर्णपणे स्पष्ट दिशा नसलेले मिश्र संकेत पाहायला मिळत आहेत. निफ्टी 23,100 च्या सपोर्टवर टिकतो का आणि 23,360-23,450 या रेंजमध्ये रेसिस्टन्स पार करतो का, यावर लक्ष राहणार आहे.

नोंद: शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. वरील माहिती केवळ बातमी आणि बाजारातील घडामोडी समजून घेण्यासाठी आहे; गुंतवणुकीचा सल्ला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT