Stock Market Today: आज गुरुवारी (21 मे) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीसह झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हं दिसू लागल्याने जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. बाजार उघडताच सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी वधारला, तर निफ्टीने 23,800 चा टप्पा पार केला.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक बाजारांमध्ये अनिश्चितता होती. मात्र, आता दोन्ही देशांकडून सकारात्मक संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढताना दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले. यामुळे तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता निर्माण झाली आणि बाजाराला मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनीही चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे सांगत मवाळ भूमिका घेतली आहे.
सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला, तर निफ्टी सुमारे 150 ते 200 अंकांच्या तेजीसह 23,800 च्या वर पोहोचला. बँक निफ्टीतही 300 अंकांची तेजी पाहायला मिळाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. विशेषतः Grasim, BEL आणि Indigo या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली.
अमेरिका-इराण तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे ब्रेंट क्रूडच्या किंमती जवळपास 5 टक्क्यांनी घसरून 105 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आल्या आहेत. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशासाठी ही सकारात्मक बाब मानली जाते, कारण यामुळे महागाईवरील दबाव कमी होऊ शकतो.
अमेरिकन शेअर बाजारांनीही मजबूत कामगिरी केली. डाऊ जोन्समध्ये जवळपास 650 अंकांची वाढ झाली, तर नॅस्डॅक 400 अंकांनी वाढला. बॉण्ड यिल्डमध्ये नरमाई आणि युद्धाचा धोका कमी झाल्यामुळे टेक आणि ग्रोथ स्टॉक्समध्ये खरेदी वाढल्याचं दिसून आलं.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) बाजारातून विक्री केली असली तरी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग तिसऱ्या दिवशी खरेदी कायम ठेवली. त्यामुळे बाजाराला आधार मिळाला.
आज गुंतवणूकदारांचं लक्ष अनेक मोठ्या कंपन्यांच्या तिमाही निकालांकडे असणार आहे. विशेषतः ITC, Max Healthcare, Auro Pharma, GAIL, Prestige Estates आणि Nykaa यांच्या निकालांवर बाजाराची नजर राहणार आहे.
तसंच, संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत काही मोठे आर्थिक किंवा पायाभूत निर्णय होतात का, याकडेही गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत.