Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठ्या घसरणीसह व्यवहाराची सुरुवात झाली. जागतिक स्तरावरील वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी घसरला, तर निफ्टीही जवळपास 180 अंकांच्या घसरणीसह 23,500 वर उघडला.
सकाळी सुमारे 9:30 च्या सुमारास सेन्सेक्स 566 अंकांनी घसरून 75,467 वर व्यवहार करत होता. त्याचवेळी निफ्टी 170 अंकांच्या घसरणीसह 23,466 वर होता. बँक निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसून आली आणि तो 584 अंकांनी खाली येत 54,535 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही सुमारे 1 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
आजच्या व्यवहारात आयटी, ऑटो, मेटल आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. टेक महिंद्रा, टाटा स्टील, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, एलअँडटी आणि इंडिगो यांसारख्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे एफएमसीजी क्षेत्रातील काही शेअर्स मात्र तेजीत दिसले. हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, आयटीसी, टाटा कन्झ्युमर, भारती एअरटेल, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स यांसारख्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारातही अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद ठेवण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत जवळपास 9 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेली आहे. या घडामोडींमुळे जागतिक पुरवठा साखळी आणि महागाईबाबत चिंता वाढली आहे.
जागतिक तणाव आणि तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम अमेरिकन बाजारांवरही झाला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज सुमारे 750 अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक निर्देशांकातही सुमारे 400 अंकांची घसरण झाली. सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकन बाजार दबावाखाली राहिल्याने जागतिक गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
भारतीय बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) विक्री सुरूच आहे. सलग दहाव्या दिवशी त्यांनी रोख बाजार, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून सुमारे 10,321 कोटी रुपयांची विक्री केली. याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सलग बाराव्या दिवशी खरेदी करत सुमारे 7,450 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला.
दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहू शकतो आणि मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.