Stock Market Today Updates: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजाराने सुस्त सुरुवात केली. आज निफ्टी 34 अंकांनी घसरून 25,999 वर उघडला, तर सेंसेक्स 140 अंकांनी खाली येत 85,125 वर स्थिरावला. गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष आज सकाळी 10 वाजता जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीवर आहे, कारण याच निर्णयावर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल.
गुरुवारी सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराला थोडा दिलासा मिळाला होता आणि निफ्टी 48 अंकांनी वाढून 26,033 वर बंद झाला होता. आजच्या व्यवहारात रुपयानेही तेजी दाखवली असून तो 14 पैशांनी सुधारत 89.84 वर उघडला आहे. काल रुपया 89.98 वर बंद झाला होता.
सुरुवातीच्या व्यवहारात बाजार तुलनेने फ्लॅट आहे आणि निफ्टी 26,000 च्या आसपास आहे. सेंसेक्सच्या 30 शेअर्सपैकी निम्मे लाल तर निम्मे हिरव्या रंगात दिसत आहेत. इटरनल, मारुती, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि कोटक महिंद्रा बँक या शेअर्समध्ये तेजी असून, रिलायन्स, ट्रेंट, टाटा स्टील आणि टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. इटरनलमध्ये सुमारे 1% वाढ, तर रिलायन्समध्ये 0.75% घसरण झाली आहे.
दरम्यान, आज सकाळी 10 वाजता RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून मॉनिटरी पॉलिसीची घोषणा होणार आहे. बाजाराला अशी अपेक्षा आहे की रेपो दरात पुन्हा 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली जाऊ शकते. यावर्षी RBIने आधीच तीन वेळा व्याजदर कमी केले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पाच वर्षांनी पहिल्यांदाच दरकपात करण्यात आली होती आणि रेपो दर 6.25% वर आला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा 25 bps आणि जूनमध्ये 50 bps कपात करून सध्याचा रेपो दर 5.5% ठेवण्यात आला आहे.