Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; आयटी शेअर्सची जोरदार मुसंडी, निफ्टी 23,731 वर

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली असून निफ्टी 23,731 वर उघडला, तर सेन्सेक्समध्येही वाढ दिसून आली.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. जागतिक संकेत आणि आयटी क्षेत्रातील मजबूत खरेदीच्या जोरावर बाजार हिरव्या रंगात उघडला. निफ्टी 42 अंकांच्या वाढीसह 23,731 वर सुरू झाला, तर सेन्सेक्सने 98 अंकांची वाढ दाखवत 75,497 पातळीवर ओपनिंग केली. गुरुवारी निफ्टी 277 अंकांच्या तेजीसह 23,689 वर बंद झाला होता.

आजच्या तेजीमध्ये आयटी क्षेत्राने सर्वाधिक हातभार लावला. निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे 2.5 टक्क्यांची दमदार वाढ दिसून आली. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेक हे निफ्टीतील प्रमुख तेजीत राहिलेले शेअर्स ठरले.

कंपनीच्या तिमाही निकालांनंतर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचा शेअर सर्वाधिक चर्चेत राहिला. मजबूत निकालांच्या पार्श्वभूमीवर या शेअरमध्ये जवळपास 7 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि तो निफ्टीतील टॉप गेनर ठरला. दुसरीकडे हिंडाल्को, BEL, ट्रेंट आणि इटर्नल या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

दरम्यान, जवळपास चार वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ जाहीर झाल्याने बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष महागाईकडे वळले आहे. पेट्रोल प्रति लिटर 3.14 रुपये, तर डिझेल 3.11 रुपयांनी महागले आहे. 2022 नंतर प्रथमच इंधन दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मार्च 2024 मध्ये निवडणुकीपूर्वी सरकारने इंधन दरात 2 रुपयांची कपात केली होती.

इंधन दरवाढीचा थेट परिणाम महागाईवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यात घाऊक महागाई 42 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली होती. त्यातच MGL आणि IGL कंपन्यांनी CNG दर वाढवले आहेत. त्यामुळे बाजारासाठी महागाई हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही घडामोडी बाजाराच्या दिशेसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किंमती 107 डॉलरच्या आसपास पोहोचल्या आहेत. दुसरीकडे रुपयातील घसरण कायम असून डॉलरच्या तुलनेत रुपया 96 च्या जवळ पोहोचल्याने दबाव वाढला आहे.

तथापि, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) विक्री कमी होत असल्याचे संकेत आहेत. गुरुवारी कॅश मार्केटमध्ये FIIs ने सुमारे 187 कोटी रुपयांची खरेदी केली. त्यामुळे बाजारातील भावनांना काहीसा आधार मिळताना दिसत आहे.

HDFC सिक्युरिटीजचे प्राइम रिसर्च प्रमुख देवर्ष वकील यांच्या मते, निफ्टीसाठी 23,800 ही पातळी अत्यंत महत्त्वाची आहे. निफ्टीने हा स्तर पार केल्यास बाजारात पुन्हा तेजीचा कल दिसू शकतो आणि निर्देशांक 24,100 पर्यंत जाऊ शकतो. मात्र, अल्पकालीन आधार 23,262 वर असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे रिसर्च प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, रुपयाने विक्रमी नीचांकी स्तर गाठला असला तरी बाजारात गुरुवारी रिकव्हरी दिसली. सरकार परदेशी गुंतवणूकदारांना बॉण्ड मार्केटमध्ये करसवलत देण्याचा विचार करू शकते. तसेच डॉलर आउटफ्लो रोखण्यासाठी LRS नियम अधिक कडक करण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनमधील सकारात्मक चर्चांमुळेही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT