Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे 180 अंकांनी वाढून 85,366च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीमध्येही चांगली तेजी दिसली आणि तो 26,106 च्या आसपास ट्रेड होत होता. बँक निफ्टी मात्र सपाट होता. निफ्टी मिडकॅप 100 देखील हिरव्या रंगात व्यवहार करत होता.
आजच्या सत्रात मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसली. त्याचवेळी IT आणि फार्मा शेअर्समध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली. निफ्टीवर Adani Enterprises, Adani Ports, Reliance, TMPV, Axis Bank आणि Jio Financials हे टॉप गेनर्स ठरले. तर HCL Tech, HDFC Life, Max Healthcare, Dr. Reddy’s, ICICI Bank आणि ONGC हे टॉप लूजर्स होते.
अमेरिकन बाजारांमध्ये टेक शेअर्सच्या जोरावर तेजी परतली आहे. चार दिवसांच्या सलग घसरणीनंतर डाओ जॉन्स थोड्या वाढीसह बंद झाला, तर नॅस्डॅक सव्वाशे अंकांनी वाढला. बाजार बंद झाल्यानंतर Nvidiaच्या निकालांचा परिणाम तात्काळ दिसला आणि नॅस्डॅक फ्युचर्समध्ये 400 अंकांची वाढ झाली. डाओ फ्युचर्सही 200 अंकांनी वर गेले. या सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आणि GIFT निफ्टी सुमारे 80 अंकांनी वाढून 26,150 च्या आसपास पोहोचला.
देशांतर्गत बाजारात सोन्याने 400 रुपयांनी वाढ घेत 1,23,000 चा स्तर गाठला. चांदीही 500 रुपयांनी वाढून 1,55,100 च्या जवळ पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीला आधार मिळाला. सोने 35 डॉलर्सने तर चांदी जवळपास 2% वाढली. याउलट कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण कायम आहे आणि भाव 2% घसरून 64 डॉलर्स खाली आले.
भारतीय बाजारात देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचे (DIIs) खरेदीचे सत्र सलग 58 व्या दिवशीही सुरू राहिले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. बुधवारी DIIs ने 1,360 कोटींची खरेदी केली. त्याच दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनीही (FIIs) एकूण 3,000 कोटींची खरेदी केली. त्यामुळे बाजाराला आधार मिळाला आहे.
IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने 18,000 कोटी रुपयांचा बायबॅक सुरू केला असून हा 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. हा बायबॅक शेअरहोल्डर्ससाठी सकारात्मक मानला जात आहे.
Fujiyama Power Systems चा IPO आज लिस्ट होणार आहे. IPO फक्त 2 पटच सबस्क्राईब झाला होता. तर Excelsoft Technologies च्या IPO ला पहिल्याच दिवशी दमदार प्रतिसाद मिळाला.