Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; IT शेअर्समध्ये पुन्हा तेजी, निफ्टी 150 अंकांनी वाढला

Stock Market Today: मार्च सिरीजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जोरदार वाढ पाहायला मिळाली असून निफ्टी 150 हून अधिक अंकांनी वधारला आहे. IT शेअर्समध्ये पुन्हा खरेदी सुरू झाल्याने संपूर्ण बाजाराला आधार मिळाला.

Rahul Shelke

Stock Market Today: मार्च सिरीजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज सकाळी बाजारात वाढ झाली. व्यवहार सुरू होताच निफ्टी 88 अंकांच्या वाढीसह 25,512 वर उघडला, तर सेन्सेक्स 304 अंकांनी वाढून 82,530 वर पोहोचला. सुरुवातीच्या काही मिनिटांतच निफ्टीत 150 पेक्षा जास्त अंकांची तेजी दिसून आली आणि निर्देशांक 25,550 च्या पुढे व्यवहार करताना दिसला.

मंगळवारी फेब्रुवारी सिरीजच्या एक्सपायरी दिवशी निफ्टी तब्बल 286 अंकांनी घसरला होता. त्यामुळे आजची तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक आहे. आजच्या सत्रात सर्व सेक्टोरल निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. त्यात आयटी क्षेत्राने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं. आयटी इंडेक्समध्ये जवळपास 2.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. याशिवाय मेटल आणि रियल्टी सेक्टरमध्येही सव्वा टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

विशेष म्हणजे आयटी शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्समधील 30 पैकी तब्बल 25 शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. Tech Mahindra, HCL Technologies, Tata Consultancy Services आणि Infosys हे आयटी शेअर्स आज टॉप गेनर्समध्ये राहिले आणि या शेअर्समध्ये अडीच टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. दुसरीकडे Bajaj Finance, State Bank of India आणि Asian Paints या शेअर्समध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली.

मागील काही दिवसांपासून बाजारात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) आयटी कंपन्यांच्या भविष्यातील कमाईवर निर्माण झालेली अनिश्चितता, तसेच अमेरिका–ईरान तणाव आणि टॅरिफबाबत अमेरिकेचे सातत्याने बदलणारे निर्णय यांचा दबाव होता. त्यामुळे आयटी इंडेक्स आपल्या उच्चांकापासून जवळपास 25 टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र आजच्या सत्रात या शेअर्समध्ये पुन्हा खरेदी होताना दिसत आहे.

फेब्रुवारी सिरीजमध्ये निफ्टीत सुमारे 249 अंकांची वाढ झाली, तर बँक निफ्टी तब्बल 1,800 हून अधिक अंकांनी वाढला. गेल्या सहा सिरीजपासून बँक निफ्टी सातत्याने सकारात्मक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर Geojit Investmentsचे रिसर्च प्रमुख विनोद नायर म्हणाले की, मंगळवारी झालेली घसरण ही प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील विक्री आणि टॅरिफविषयीच्या भीतीमुळे होती. आयटी कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदार सावध झाले होते.

त्यांच्या मते, सध्या बाजार भौगोलिक-राजकीय घडामोडींबाबत अतिशय संवेदनशील आहे. अमेरिका–ईरान तणाव, जागतिक घडामोडी आणि AI संदर्भातील बदल हे सर्व घटक अल्पकालीन चढ-उतार वाढवू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या देशांतर्गत मागणीवर आधारित क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करणं शहाणपणाचं ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT