Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराने जोरदार कमबॅक केला. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी वाढला, तर निफ्टीमध्ये 170 अंकांची वाढ दिसून आली. आज निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर्समध्ये खरेदी सुरू होती. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण होतं.
कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत—
सेन्सेक्स 550 अंकांनी वाढून 82,459 वर उघडला
निफ्टी 187 अंकांनी वाढून 25,344 वर उघडला
बँक निफ्टी 394 अंकांनी वाढून 59,194 वर उघडला
रुपया 17 पैशांनी वाढून 91.53 प्रति डॉलरवर उघडला
आजच्या ट्रेडिंगमध्ये PSU बँक आणि ऑटो सेक्टरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी होती. निफ्टी मिडकॅप सेलेक्ट वाढीसह व्यवहार करत होता तर निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्येही चांगली खरेदी दिसली.
दावोसहून आलेल्या काही सकारात्मक संकेतांमुळे जागतिक बाजारात उत्साह दिसला. त्यामुळे भारतीय बाजारालाही आधार मिळाला. GIFT निफ्टी वाढीसह ट्रेड होत होता, डाओ फ्युचर्स तेजीत होते तर आशियाई बाजारात जपानचा निक्केई वाढला.
ग्रीनलँड आणि टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेकडून मवाळ भूमिका दिसल्याने जागतिक बाजारांना दिलासा मिळाला. त्यामुळे ट्रेड सेंटिमेंटही सुधारले.
कमोडिटी मार्केटमध्येही हालचाल वाढली आहे. एमसीएक्सवर सोनं मोठ्या वाढीसह नवे उच्चांक गाठत होते, तर चांदीही रेकॉर्ड लेव्हलच्या जवळ दिसली. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडेही लक्ष वाढत असल्याचं चित्र आहे.
परदेशी गुंतवणूकदार (FII) सलग विक्री करत असले तरी आज घसरण जास्त झाली नाही.
दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) सलग 101व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत बाजाराला आधार दिला.
थोडक्यात तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसली. PSU बँक आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली, जागतिक संकेतही सकारात्मक होते आणि DIIच्या खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.