Stock Market Sensex Today
भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि. २ जुलै) अस्थिरता दिसून आली. यामुळे तेजीत खुले झालेले सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स २८७ अंकांनी घसरून ८३,४०९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ८८ अंकांच्या घसरणीसह २५,४५३ वर स्थिरावला.
भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक आज किरकोळ वाढीसह खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७२ अंकांनी वाढून ८३,७७० वर पोहोचला होता. तर निफ्टी ५० निर्देशांकाने अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,५५० वर व्यवहार केला. सुरुवातीला १ टक्के वाढलेला निफ्टी आयटी सपाट पातळीवर बंद झाला. आजच्या सत्रात फायनान्सियल शेअर्स घसरले.
अमेरिका भारतासोबत द्विपक्षीय व्यापार करार करू शकते, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्स आणि निफ्टी ५० तेजीत खुले झाले होते. पण फायनान्सियल शेअर्समधील घसरणीने बाजारात दबाव निर्माण झाला.
सुरुवातीला सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर्स २.३ टक्के वाढला. टीसीएस १.५ टक्के, टेक महिंद्राने १ टक्के वाढीसह व्यवहार केला. एचसीएल टेक, एनटीपीसी, कोटक बँक, सन फार्मा, भारती एअरटेल हे शेअर्सही वाढले. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, इर्टनल, ट्रेंट, एशियन पेंट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स हे शेअर्स घसरले.
व्यापार भागीदार देशांवर टॅरिफ वाढवण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ जुलैची डेडलाईन पाळण्याची पुष्टी केल्याने आशियाई बाजारात घसरण दिसून आली. यामुळे जागतिक व्यापार तणाव पुन्हा वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.