

अर्थज्ञान : राकेश माने
काही गुंतवणूकदारांना तर वाटते की, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबी त्यांना वाचवू शकते, त्यांचे भांडवल परत करू शकते; पण याचे खरे उत्तर काय आहे? नाही!
जेव्हा एखादा म्युच्युअल फंड किंवा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी बॉण्ड डिफॉल्ट, फ्रंट रनिंग इत्यादी प्रकरणांमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे अडचणीत सापडते, तेव्हा अनेक गुंतवणूकदार आमचे पैसे परत द्या, अशी मागणी करतात; पण खरोखरच असे होते का ?
आपण म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतो तेव्हा, आपण त्या कंपनीकडून काही युनिटस् खरेदी करता. हे युनिटस् त्या क्षणाच्या बाजारमूल्यावर (एनएव्ही) मिळतात. उदा. एनएव्ही ९२९.३२९ असेल आणि आपण ५० लाख रुपये गुंतवले, तर ५०,००,००० भागिले ९२९.३२९ = ५३८०.२२६ युनिटस् आपल्याला मिळतील. त्यानंतर आपण हे युनिटस् विकायचे (रिडीम) ठरवले, तर त्यावेळचा एनएव्ही महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, जर एनएव्ही ५५७ झाला असेल, तर ५३८०.२२६ भागिले ५५७ २९.९६ लाख रुपये मिळतील. यामधून यावरून बाहेर पडताना लागणारा चार्ज एक्झिट लोड वजा होतो. म्हणजेच तुमचे मूळ ५० लाख रुपये पुन्हा मिळतील, याची शाश्वती नाही. जर एनएव्ही खाली गेला, तर नुकसान होणारच !
संकटाच्या वेळी म्युच्युअल फंडसना खरी जोखीम गुंतवणूकदारांकडूनच निर्माण होते. याचे कारण म्युच्युअल फंडस्नी फार थोडी रक्कम आणि बॉण्डस् हाताशी ठेवलेले असतात. पण, संकट आलं की लोक घाबरून मोठ्या प्रमाणावर पैसे काढू लागतात. त्यामुळे फंड मॅनेजरला नाईलाजाने त्यांचे मोठे शेअर किंवा बॉण्ड विकावे लागतात. यात दोन धोके असतात. तातडीने विक्री केल्यामुळे बरेचदा कमी किमतीत विकावे लागतात. त्यामुळे एनएव्ही आणखी खाली जातो. यालाच रिडेम्प्शन रिस्क म्हणतात. फ्रैंकलिन टेम्पलटनने सहा फंडस् बंद केले होते. याचे कारण त्यांच्याकडे असलेले बॉण्डस् बाजारात विकता येईनात.
यातुलनेत बँकांचा विचार केला, तर बँकेतील रकमेवर ५ लाखांपर्यंत विमासंरक्षण आहे. तसेच बँक दिवाळखोरीत निघाली तरी काही रक्कम परत मिळण्याची शक्यता तुलनेने जास्त असते. बँकिंग व्यवस्थेवर केंद्रीय मध्यवर्ती बँकेचे नियमन असल्यामुळे आपला निधी बऱ्याच अंशी सुरक्षित असतो; पण म्युच्युअल फंडांमध्ये अशी स्थिती नसते.
हे लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. आपला काबाडकष्टातून जमवलेला पैसा गुंतवताना योजना समजून घ्या.
कोणत्या फंडात गुंतवणूक करता आहात, त्याचा पोर्टफोलिओ समजून घ्या. फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहा. रिस्क प्रोफाईल तुमच्या गरजेनुसार जुळतेय का ते तपासा. विविध फंडात गुंतवणूक करून विविधीकर करा. फंड अडचणीत आल्याचे समजल्यास आपल्या जोखीम क्षमता ओळखा. घाबरून विक्री करू नका. अशा वेळी शांत राहून दीर्घकालीन विचार करा. सेबी मदत करेल, अशी आशा बाळगू नका.
म्युच्युअल फंड हे मार्केटशी जोडलेले उत्पादन आहे. त्यात आकर्षक लाभ आहे, तशी जोखीमसुद्धा असते. फंड अडचणीत आला, म्हणजे सरकार पैसे परत देईल, असा समज चुकीचा आहे. फंडची आर्थिक परिस्थिती, बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा प्रतिसाद हे सर्व एकत्र येऊन एनएव्ह आणि त्याच्याशी संबंधित परताव्याला प्रभावित करतात. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना स्वतःची तयारी, समज आणि योग्य माहिती, हेच आपले बचाव कवच आहे.
नाही. सेबी ही संस्था म्युच्युअल फंडांची निगराणी करते; पण एखादा फंड अडचणीत आला, तर त्यातील गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची जबाबदारी सेबी घेऊ शकत नाही. बँकांसारखी डिपॉझिट इन्शुरन्स योजना म्युच्युअल फंडांसाठी लागू होत नाही.