Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलेला दिसला. निफ्टी 220 अंकांनी मजबूत होत 23,940 वर उघडला, तर जागतिक घडामोडींमुळे बाजाराचा मूड सकारात्मक दिसून आला.
यामागचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतींमधील घसरण आणि इराण-अमेरिका चर्चेबाबत समोर आलेल्या सकारात्मक बातम्या. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे भारतीय रुपयालाही आधार मिळाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 35 पैशांनी मजबूत होत 95.34 वर उघडला.
गेल्या आठवड्यात बाजारात संमिश्र वातावरण दिसलं असलं तरी काही क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली. निफ्टी 0.3 टक्क्यांच्या वाढीसह 23,719 वर बंद झाला होता. मिडकॅप शेअर्समध्ये 1.1 टक्क्यांची तेजी दिसली, तर स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास स्थिर राहिला.
सेक्टोरल इंडेक्समध्ये IT क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. IT इंडेक्समध्ये 4.1 टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर रिअल्टी आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातही खरेदीचा जोर दिसला. मात्र FMCG क्षेत्रात 1.5 टक्क्यांची घसरण झाली. PSU आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातही काही प्रमाणात घसरण दिसली.
गेल्या आठवड्यात Grasim Industries हा निफ्टीमधील सर्वात मोठा गेनर ठरला. या शेअरमध्ये 7.5 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय Wipro, Infosys आणि Trent या शेअर्सनीही चांगली कामगिरी केली.
दुसरीकडे, Power Grid हा सर्वात मोठा लूजर ठरला. या शेअरमध्ये 3.8 टक्क्यांची घसरण झाली. तसेच Tata Steel आणि Tata Consumer यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
मार्केट एक्स्पर्ट्सच्या मते, Q4 निकालांचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता मोठ्या आर्थिक घडामोडींवर असेल. विशेषतः इराण-अमेरिका चर्चा, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील परिस्थिती, कच्च्या तेलाचे दर, बॉण्ड यिल्डमधील बदल आणि रुपयाची हालचाल हे घटक बाजाराची पुढची दिशा ठरवतील.
तांत्रिक विश्लेषणानुसार, 23,850 ते 23,900 हा निफ्टीसाठी महत्त्वाचा रेसिस्टन्स झोन आहे. तर 23,400 ते 23,350 हा सपोर्ट झोन मानला जात आहे. बाजारात मोठी हालचाल या पातळ्यांच्या वर किंवा खालीच पाहायला मिळू शकते.
दरम्यान, स्ट्रेट ऑफ होर्मुजबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत, ज्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याशिवाय इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचे संकेत आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक वक्तव्य केल्यानेही बाजारातील भावना मजबूत झाल्या आहेत.
एकूणच, आठवड्याची सुरुवात शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरली असून, पुढील काही दिवस जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडींवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे.