Stock Market Crash
मध्य पूर्वेतील (Middle East tensions) वाढलेल्या संघर्षाचे पडसाद सोमवारी (दि.२३ जून) भारतीय शेअर बाजारात उमटले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ८१,५८० पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २४८ अंकांनी घसरून २४,८७० च्या खाली व्यवहार करत आहे. मुख्यतः आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये जोरदार विक्रीचा मारा दिसून आला आहे.
अमेरिकेने इराणमधील महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. यामुळे आशियाई बाजारात कमकुवत स्थिती दिसून आली. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स- निफ्टी घसरले.
निफ्टी आयटी १.६ टक्के घसरला आहे. निफ्टी ५० वर इन्फोसिस, टीसीएस, ओएफएसएस, एचसीएल टेक, विप्रो हे शेअर्स १ ते २.६ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. निफ्टी बँक, फायनान्सियल सर्व्हिेसेस, ऑटो, एफएमसीजी हे निर्देशांक घसरणीसह खुले झाले आहेत.
सेन्सेक्सवर इन्फोसिस, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, एम अँड एम, पॉवर ग्रिड, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप लूजर्स आहेत. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंट हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
अमेरिकेने इराणमधील आण्विक ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर कच्च्चा तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचा दर १.७ टक्के वाढून प्रति बॅरल ७६.७९ डॉलरवर पोहोचला आहे. हा दर पाच महिन्यांतील उच्चांकी दर आहे. इराण तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के कच्च्या तेलाची निर्यात चालते.