
Narayana Murthy on AI
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी AI मुळे नोकऱ्या जातील, ही शक्यताच फेटाळून लावली आहे. त्याऐवजी त्यांनी असा दावा केला आहे की एआय तंत्रज्ञानामुळे नवीन प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्यासोबतच भारतातील आयटी क्षेत्रात उत्पादकताही वाढेल.
नारायण मूर्ती यांनी, एआयच्या संभाव्य परिणामांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर एक आशावादी दृष्टिकोन समोर मांडला आहे. त्यांनी एआयकडे मनुष्यबळाची जागा घेण्याऐवजी एक सहाय्यक साधन म्हणून पाहा, यावर भर दिला.
मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, ओपनएआयचे जनरेटिव्ह एआय टूल चॅटजीपीटीचा वापर केल्याने त्यांची उत्पादकता पाच पटीने वाढली आहे. "नवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जातील, ही संपूर्ण भीती योग्य नाही. उलट यामुळे एक वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांची संधी निर्माण होतील. उदाहरणार्थ, माझ्या भाषणांसाठी ChatGPT चा वापर करताना मला असे आढळून आले की माझ्या भाषणासाठी काय मुद्दे आवश्यक आहेत हे देणे चातुर्यच आहे आणि त्याला योग्य प्रश्न विचारणे, हेदेखील चातुर्य आहे."
चॅटजीपीटीमधील त्यांच्या वैयक्तिक अनुभवामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत मोठा बदल घडून आला. त्यांच्या भाषणाच्या तयारीचा वेळ २५-३० तासांवरून कमी होऊन केवळ पाच तासांवर आला. यामुळे मी माझी स्वतःची कार्यक्षमता ५ पटीने वाढवली," असे नारायण मूर्ती यांनी नमूद केले. त्यांनी एकूणच मनुष्यबळ कमी करण्याऐवजी ती वाढवण्याची एआयची क्षमता अधोरेखित केली.
एनआर नारायण मूर्ती यांनी त्यांच्या मुलाखतीत १९७० च्या दशकातील बँकिंग क्षेत्रातील मोठ्या बदलाचा उल्लेख केला. तंत्रज्ञानाताली प्रगती रोजगाराच्या संधी निर्माण करते. त्यामुळे कधीही नोकऱ्या जात नाहीत, असे ते म्हणाले. "बँकांमध्ये जेव्हा संगणक आले तेव्हा सगळे म्हणाले होते की, 'आता नोकऱ्या जातील.' पण असे काही घडले नाही. उलट बँकिंग क्षेत्रात नोकऱ्या ४० ते ५० च्या टक्क्यांनी वाढल्या," असे त्यांनी स्पष्ट केले.
एआयचा प्रभावीपणे वापर करण्याची गुरुकिल्ली म्हणजे, त्याला योग्य प्रश्न विचारणे आणि गरजा अचूकरित्या परिभाषित करणे यात आहे, असेही ते म्हणाले.