Stock Market Crash Pudhari
अर्थभान

Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार; काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी बुडाले, घसरणीची 3 मोठी कारणं

Stock Market Crash: सेन्सेक्स 786 अंकांपर्यंत घसरला, तर निफ्टी 22,400 च्या खाली गेला आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांची घट झाली.

Rahul Shelke

Stock Market Crash: शेअर बाजारात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात घसरणीसह झाली. भारतीय शेअर बाजारात सुरुवातीपासूनच जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. त्यानंतर बाजारातील घसरण आणखी वाढली.

गुरुवारी बाजार सुरू होताना सेन्सेक्स 287.40 अंकांनी घसरून 72,192.89 अंकांवर उघडला. निफ्टीमध्येही 76.75 अंकांची घसरण झाली आणि तो 22,543.70 अंकांवर खुला झाला. सुरुवातीला बाजाराने काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढत गेला आणि बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.

दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्स तब्बल 786 अंकांनी घसरून 71,761 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टीमध्येही सुमारे 247 अंकांची घसरण झाली. त्यामुळे निफ्टी 22,400 अंकांच्या महत्त्वाच्या पातळीखाली गेला.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण झाली?

आज सेन्सेक्समध्ये M&M, मारुती सुझुकी, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, ITC, HUL आणि BEL या शेअर्समध्ये 3 ते 4 टक्क्यांची घसरण झाली.

त्याचबरोबर ट्रेंट, L&T, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, एटरनल आणि टायटन यांच्या शेअर्समध्येही 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मात्र, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ झाली.

गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. बुधवारी बाजार बंद होताना BSE वर नोंद असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 4,71,86,380.74 कोटी रुपये होते. गुरुवारी ते घटून 4,63,28,901.87 कोटी रुपयांवर आले.

म्हणजेच बाजारातील घसरणीमुळे सुरुवातीच्या व्यवहारातच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 8,57,478.87 कोटी रुपयांची घट झाली.

शेअर बाजार घसरण्याची तीन प्रमुख कारणे

परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठी विक्री

भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. सलग पाचव्या दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधून पैसा काढला. 30 सप्टेंबर रोजी त्यांनी सुमारे 10,148 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 20,128 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अमेरिकेतील 10 वर्षांच्या रोख्यांवरील परतावा वाढल्याने परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा भारतीय बाजारातून बाहेर जाण्याचा दबाव वाढला आहे.

मात्र, परदेशी गुंतवणूकदारांकडून प्राथमिक बाजार आणि काही महागड्या मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी सुरू आहे.

रुपयाच्या घसरणीचा बाजारावर परिणाम

अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम भारतीय रुपयावरही झाला आहे. डॉलर निर्देशांक तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आशियातील अनेक चलनांसोबत रुपयावरही दबाव वाढला.

गुरुवारी रुपया सुमारे 0.16 टक्क्यांनी घसरून प्रति डॉलर 95.98 रुपयांवर आला. रुपया कमकुवत झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारातील गुंतवणूक तुलनेने कमी आकर्षक ठरू शकते. त्यामुळे बाजारातील विक्रीचा दबाव आणखी वाढतो.

इंडिया VIX मध्ये वाढ

बाजारातील भीती आणि अस्थिरता मोजण्यासाठी इंडिया VIX हा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. गुरुवारी इंडिया VIX मध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आणि तो 14.13 वर पोहोचला.

VIX वाढणे म्हणजे बाजारात अनिश्चितता आणि चढ-उतार वाढल्याचे संकेत मानले जातात. त्यामुळे गुंतवणूकदार मोठी जोखीम घेण्यापासून सावध राहतात आणि बाजारात विक्रीचा दबाव वाढू शकतो.

गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी?

शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार कमी झालेल्या भावात शेअर्स खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र, केवळ शेअरचा भाव घसरला आहे म्हणून लगेच खरेदी करणे योग्य ठरेलच असे नाही.

बाजार विश्लेषक विपिन दीसेना यांच्या मते, सध्याच्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांनी घाईने निर्णय घेणे टाळावे. कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसायाची क्षमता आणि भविष्यातील वाढीच्या संधी यांचा विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असताना केवळ स्वस्त भाव दिसत आहे म्हणून शेअर्स खरेदी करण्यापेक्षा मजबूत आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरू शकते.

नोंद: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT