Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला, काय आहे कारण?

Stock Market Today: जागतिक बाजारातील घसरण, मध्य-पूर्वेतील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी घसरला, तर निफ्टी 23,600 च्या खाली पोहोचला.

Rahul Shelke

Stock Market Today: जागतिक घडामोडींचा परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मध्य-पूर्वेत सुरू असलेला संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकेच्या नव्या व्यापार धोरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली.

व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी घसरला, तर निफ्टी 300 अंकांनी घसरून 23,600 च्या खाली गेला. सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. ऑटो, पीएसयू बँक, मीडिया, एनबीएफसी, खासगी बँका, रिअल्टी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांतील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

सकाळी सुमारे 9.30 वाजता सेन्सेक्स 828 अंकांनी घसरून 76,035 या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचवेळी निफ्टी 267 अंकांनी घसरून 23,601 च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी 763 अंकांनी घसरून 54,968 वर आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 920 अंकांनी तर स्मॉलकॅप 100 निर्देशांक 280 अंकांनी खाली आला.

या घसरणीमागे जागतिक बाजारातील घसरण हा प्रमुख घटक मानला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सेक्शन 301 अंतर्गत भारत आणि चीनसह 16 देशांविरोधात व्यापार चौकशी सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती पुन्हा वाढली आहे.

दरम्यान, मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. युद्धाला आता 13 दिवस झाले असून इराणने कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत जाऊ शकते, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूडची किंमत 12 टक्क्यांहून अधिक वाढून 100 डॉलरच्या पुढे गेली आहे.

तेल संकट कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) पुढे आली आहे. IEA ने आपल्या राखीव साठ्यातून 40 कोटी बॅरल कच्चे तेल बाजारात सोडण्याची घोषणा केली आहे. 32 सदस्य देश असलेल्या या संस्थेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इच्छा असल्यास हे युद्ध लवकर संपवता येईल, असे विधान केले आहे. तर इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी पूर्ण विजय मिळेपर्यंत हल्ले सुरूच राहतील असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे इराणने गल्फ देशांतील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित बँकांवर हल्ल्याची धमकी दिली आहे.

या घडामोडींचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावरही झाला. Dow Jones निर्देशांक सुमारे 300 अंकांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, तर Nasdaq निर्देशांकात किरकोळ वाढ दिसून आली.

जागतिक अनिश्चिततेमुळे डॉलर मजबूत झाला आणि डॉलर निर्देशांक 99च्या वर गेला. याचा परिणाम मौल्यवान धातूंवर झाला. सोने सुमारे 1,500 रुपयांनी घसरून 1,61,800 रुपयांवर बंद झाले, तर चांदी सुमारे 9,400 रुपयांनी घसरून 2,68,500 रुपयांच्या खाली आली.

भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची विक्रीही सुरूच आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग नवव्या दिवशी सुमारे 11,000 कोटी रुपयांची विक्री केली. याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग अकराव्या दिवशी सुमारे 5,000 कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला आधार दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT