Stock Market Crash Pudhari
अर्थभान

Stock Market Today: मध्यपूर्वेतील युद्धाची झळ; शेअर बाजार उघडताच कोसळला, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला

Stock Market Today: मध्यपूर्वेतील युद्धजन्य तणावामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या.

Rahul Shelke

Stock Market Today: मध्यपूर्वेतील तणावाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री पाहायला मिळाली. बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी घसरला, तर निफ्टी 300 अंकांनी खाली येत 24,840 च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टीतही सुमारे 795 अंकांची घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी पडझड झाली.

मध्यपूर्वेत नेमकं काय घडलं?

अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर मोठी लष्करी कारवाई केली. त्यानंतर परिस्थिती झपाट्याने युद्धात बदलली. प्रत्युत्तरादाखल इराणने यूएई, कतार, कुवैत, बहरेनसह मध्यपूर्वेतील आठ देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे.

या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांच्या मृत्यूची बातमीही समोर आली आहे. त्यानंतर अलीरेजा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी बदला घेण्याचा इशारा दिला आहे.

तणाव वाढत असताना इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेलपुरवठा मार्ग मानला जाणारा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ बंद केल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे 8 टक्क्यांनी वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव 81 डॉलरच्या वर गेला असून तो आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

जागतिक बाजारांवरही परिणाम

या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारांवरही दिसून आला. GIFT निफ्टी सुमारे 110 अंकांनी घसरून 25,230 च्या आसपास व्यवहार करत होता. डाओ फ्युचर्समध्ये 350 अंकांची घसरण झाली, तर जपानचा निक्केई निर्देशांक 600 अंकांनी कोसळला. यूएईतील शेअर बाजार दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत सुमारे 135 डॉलरची वाढ झाली असून दर 5,380 डॉलरच्या वर गेले आहेत. चांदीतही जवळपास 3 टक्क्यांची वाढ होऊन ती 96 डॉलरच्या वर पोहोचली आहे.

क्षेत्रनिहाय मोठी पडझड

भारतीय बाजारात जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात आहेत. सर्वाधिक घसरण रिअल्टी क्षेत्रात झाली, हा निर्देशांक 2.4 टक्क्यांनी खाली आला. त्याशिवाय:

  • निफ्टी ऑटो – 1.3% घट

  • निफ्टी फायनान्शियल – 0.8% घट

  • निफ्टी FMCG – 1.2% घट

  • निफ्टी IT – 1.2% घट

  • निफ्टी मीडिया – 1.8% घट

  • निफ्टी मेटल – 0.1% घट

  • निफ्टी फार्मा – 1% घट

  • निफ्टी PSU बँक – 1.3% घट

  • निफ्टी प्रायव्हेट बँक – 0.7% घट

  • निफ्टी हेल्थकेअर – 1.1% घट

  • निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स – 1.4% घट

  • निफ्टी ऑइल अँड गॅस – 1.6% घट

यावरून स्पष्ट होते की गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

पुढे काय?

तेलाच्या किमती वाढल्यास भारतासारख्या आयात-आधारित अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाईत वाढ आणि रुपयावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. बाजारातील अस्थिरता पुढील काही दिवस कायम राहू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT