Stock Market Closing Updates
मोठ्या ब्लॉक डीलमुळे गुंतवणुकीचा ओघ बाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि. २८ मे) सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स २३९ अंकांनी घसरून ८१,३१२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,७५२ वर स्थिरावला. मुख्यतः एफएमसीजी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव अधिक राहिला.
सेक्टर्समध्ये निफ्टी एफएमसीजी (Nifty FMCG) १.४ टक्के घसरला. तर निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक (Nifty PSU Bank) ०.९ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप ०.२ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी कायम राहिली. बीएसई स्मॉलकॅप ०.४ टक्के वाढून बंद झाला.
बीएसई सेन्सेक्सवरील ३० पैकी ११ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित १९ शेअर्स लाल रंगात बंद झाले.
सेन्सेक्सवर आयटीसीचा शेअर्स ३ टक्के घसरून ४१९ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचसोबत इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, पॉवर ग्रिड, अदानी पेंट्स, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे शेअर्स तेजीत राहिले.
ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयटीसीचा शेअर्स आज गडगडला. हा शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरला. ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोने मंगळवारी ब्लॉक डीलद्वारे या कंपनीतील २.६ हिस्सा विकणार असल्याची योजना जाहीर केल्यानंतर ITC चा शेअर्स खाली आला.
दुसरीकडे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी (LIC) चा शेअर्स ८ टक्के वाढला. एलआयसीने मार्च तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक ३८ टक्के वाढ नोंदवली. तसेच एलआयसीने आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर १२ रुपयांचा फायनल डिव्हिडंटदेखील जाहीर केला. या पार्श्वभूमीवर एलआयसीने शेअर्सने आज मोठी उसळी घेतली.