Stock Market Closing Updates
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि.३०) अमेरिकेच्या टॅरिफची चिंता दिसून आली. परिणामी, सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स १८२ अंकांनी घसरून ८१,४५१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ८२ अंकांच्या घसरणीसह २४,७५० वर स्थिरावला.
कमकुवत जागतिक संकेत आणि जीडीपी आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर आज गुंतवणूकदार सावध दिसून आले. मुख्यतः आज आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी आयटी १.१ टक्के घसरला.
दरम्यान, निफ्टी बँकने आज मजबूत वाढ नोंदवली. सरकारी बँक शेअर्संमध्येही खरेदी दिसून आली. तर बीएसई मिडकॅप ०.४ टक्के घसरला. स्मॉलकॅप शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी तेजी कायम राहिली. बीएसई स्मॉलकॅप ०.१७ टक्के वाढून बंद झाला.
बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २ लाख कोटींनी कमी होऊन ४४४.१९ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले.
बीएसई सेन्सेक्सवरील २४ शेअर्स लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, सन फार्मा, पॉवर ग्रिड हे शेअर्स घसरले. तर इटर्नलचा शेअर्स ४.५ टक्के वाढला. एसबीआय, एचडीएफसी बँक, एलटी, रिलायन्स हे शेअर्सही वाढून बंद झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुरुवारी वॉशिंग्टनमधील एका फेडरल अपील न्यायालयाने दिलासा देणारा निर्णय दिला. न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला आपत्कालीन शक्ती अधिकाराअंतर्गत टॅरिफ (आयात वस्तूंवर शुल्क) आकारणी सुरू ठेवण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली. या निर्णयानंतर बाजारात काही प्रमाणात टॅरिफची चिंता दिसून आली. विशेषतः त्याचा परिणाम आयटी शेअर्सवर दिसून आला. एचसीएल टेक, टेक महिंद्रा, LTIMindtree, टीसीएस हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.
निफ्टी ऑटो (Nifty Auto) निर्देशांक जवळपास १ टक्के घसरला. यावर बजाज ऑटोचा शेअर्स ३.१ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. अशोक लेलँड, एआरएफ, भारत फोर्ज, एम अँड एम हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.