Stock Market Closing Updates
भारत- पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या (India Pakistan Ceasefire) पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि.१२) बंपर तेजी नोंदवली. आजच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल २,९७५ अंकांनी वाढून ८२,४२९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ९१६ अंकांच्या वाढीसह २४,९२४ वर पोहोचला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची वाढ अनुक्रमे ३.७ टक्के आणि ३.८ टक्के एवढी राहिली. विशेष म्हणजे या तेजीमुळे दोन्ही निर्देशांकांनी १६ डिसेंबर २०२४ नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळीवर गाठली. तसेच ४ वर्षांतील ही सेन्सेक्स आणि निफ्टीची दुसरी मोठी तेजी ठरली.
टक्केवारी विचारात घेतली तर दोन्ही निर्देशांकांनी जवळपास ४ टक्क्यांची वाढ नोंदवली. ही चार वर्षांतील दुसरी सर्वांत मोठी तेजी आहे. याआधी बाजाराने सर्वात मोठी वाढ १ फेब्रुवारी २०२१ नोंदवली होती. त्यावेळी दोन्ही निर्देशांक ४.७ टक्क्यांहून अधिक वाढले होते.
जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांचेही बाजाराला समर्थन मिळाले. ज्यात अमेरिका-चीनमधील टॅरिफ तणावाची तीव्रता कमी होणे आणि रशिया-युक्रेन युद्धबंदी चर्चेची बोलणी पुढे जात असल्याबाबतच्या अनपेक्षित घडामोडींचा समावेश होता.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२ मे रोजी १६.१७ लाख कोटी रुपयांनी वाढून ४३२.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ९ मे रोजी ते ४१६.४० लाख कोटींवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १६.१७ लाख कोटींची वाढ झाली.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी रियल्टी, निफ्टी आयटी टॉप गेनर्स ठरले. दोन्ही निर्देशांकांची वाढ अनुक्रमे सुमारे ६ टक्के आणि ६.७ एवढी राहिली. तर निफ्टी फार्मा निर्देशांक सुमारे २ टक्क्यांच्या घसरणीसह खुला झाला होता. त्यानंतर त्याने रिकव्हरी केली आणि ०.१५ टक्के वाढून बंद झाला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदीचा जोर अधिक राहिला. यामुळे बीएसई मिडकॅप ३.८ टक्के आणि स्मॉलकॅप ४.१ टक्के वाढून बंद झाला.
भारत- पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर ट्रॅव्हल बुकिंग, हॉटेल आणि विमान कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर्स ७.९ टक्के, एचसीएल टेक ६.३ टक्के, टाटा स्टील ६.१ टक्के, इटर्नल ५.६ टक्के, टेक महिंद्रा ५.३ टक्के, टीसीएस ५ टक्के, ॲक्सिस बँक ४.४ टक्के, आयसीआयसीआय बँक ४.३ टक्के, एनटीपीसी ४.३ टक्के, रिलायन्स, ४.२ टक्के, अदानी पोर्ट्स ४.२ टक्के, एलटी शेअर्स ४ टक्के वाढून बंद झाला. तर दुसरीकडे इंडसइंड बँकेचा शेअर्स ३.५ टक्के आणि सन फार्माचा शेअर्स ३.३ टक्के घसरला.