Stock Market Closing Updates
जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पुन्हा रेपो दरात कपात होणार असल्याच्या शक्यतेने भारतीय शेअर बाजार बुधवारी (दि.४ जून) तीन दिवसांच्या घसरणीतून सावरला. सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ८०,९९८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७७ अंकांनी वाढून २४,६२० वर स्थिरावला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप ०.५ टक्के वाढला. मेटल, ऑईल अँड गॅस, एनर्जी शेअर्समध्येही वाढ दिसून आली. तर रियल्टी शेअर्स दबाव राहिला. निफ्टी रियल्टी निर्देशांक ०.७ टक्के घसरून बंद झाला.
बुधवारी ४ जून रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १.१६ लाख कोटी वाढून ४४५.२० लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
बीएसई सेन्सेक्सवर इर्टनलचा शेअर्स ३.३ टक्के वाढून २४५ रुपयांवर पोहोचला. त्याचबरोबर भारती एअरटेल, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील हे शेअर्सही वाढून बंद झाले. तर बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, टीसीएस, टायटन, एलटी हे शेअर्स घसरले.
स्विगीचा शेअर्स (Swiggy Share Price) आज ८.२ टक्के वाढला. तर दुसरीकडे सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्चचा शेअर्स १९ टक्के घसरला. तर आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचा शेअर्स १०.७ टक्के खाली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल (ABFRL) मधील त्यांचा संपूर्ण ६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली आहे. या वृत्तामुळे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचा शेअर्स गडगडला.
अमेरिकेने स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर अधिक टॅरिफ लागू केल्यानंतर पुन्हा व्यापार संघर्ष निर्माण झाला आहे. तरीही टेक्नॉलॉजी क्षेत्रातील शेअर्स आणि दक्षिण कोरियाच्या कोस्पी निर्देशांच्या बंपर तेजीमुळे आशियाई शेअर बाजारात बुधवारी तेजीचा माहौल राहिला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक २.६ टक्के वाढून बंद झाला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.८ टक्के आणि हाँककाँगचा हँगसेंग ०.६ टक्के वाढला.