Stock Market Closing Updates
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि. ४ जुलै) चढ-उतार दिसून आला. दरम्यान, सेन्सेक्सच्या दोन दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. सेन्सेक्स १९३ अंकांनी वाढून ८३,४३२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,४६१ वर स्थिरावला. आयटी, ऑईल अँड गॅस आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी राहिली.
आजच्या ट्रेडिंग सत्रात तीव्र चढउतार दिसून आला. एकूणच गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. यामुळे सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून ४०० अंकांनी खाली आला होता. तर निफ्टीही घसरला होता. पण त्यानंतर रिकव्हरी करत सेन्सेक्स- निफ्टी तेजीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस हे शेअर्स ०.५ ते १.६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे ट्रेंटचा शेअर्स ११.९ टक्क्यांनी घसरून टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर टाटा स्टील, टेक महिंद्रा, मारुती, अदानी पोर्ट्स, एम अँड एम, टीसीएस हे शेअर्स घसरले.
दुसरीकडे, फॅशन रिटेलर कंपनी ट्रेंटचा शेअर्स (shares of Trent) ११.९ टक्क्यांनी घसरला. या कंपनीने त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत महसूल वाढ मंदावली असल्याचा सूर व्यक्त केला होता. त्यांच्या जून-तिमाहीच्या महसुलात घट झाल्याच्या वृत्तानंतर ट्रेंटचे शेअर्स गडगडले.
भारतीय शेअर बाजारात आजही एकूणच सुस्त स्थिती राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग सहाव्या दिवशी मर्यादित श्रेणीत व्यवहार केला. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यामुळे त्यांची आज सावध भूमिका दिसून आल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.