Stock Market Closing updates
मध्य पूर्वेत कमी झालेला तणाव, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि रुपया मजबूत झाल्याने भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.२६ जून) मोठी उसळी घेतली. सेन्सेक्स १ हजार अंकांनी वाढून ८३,७५५ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३०४ अंकांनी वाढून २५,५४९ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची वाढ प्रत्येकी १.२ टक्के एवढी राहिली. फायनान्सियल आणि मेटल शेअर्समधील तेजीचा बाजाराला मोठा आधार मिळाला.
बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.३३ लाख कोटींनी वाढून ४५७.३३ लाख कोटींवर पोहोचले.
आजच्या सत्रात निफ्टी बँक निर्देशांकाने ५७,२६३ चा नवा उच्चांक नोंदवला. खासगी बँकांच्या शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी हे या निर्देशाकांच्या तेजीचे प्रमुख कारण ठरले. निफ्टी बँकवर एचडीएफसी बँक १.९ टक्के, एयू स्मॉल फायनान्स बँक १.७ टक्के, ॲक्सिस बँक १.५ टक्के, आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स १ टक्के वाढला. निफ्टी मेटल निर्देशांक २.३ टक्के वाढला. निफ्टी बँक १ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.५ टक्के वाढून बंद झाला.
तर बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप ०.१ टक्के वाढला.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, इटर्नल, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. एनटीपीसी, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, एलटी, टायटन, भारत इलेक्ट्रॉनिक्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ट्रेंट, एसबीआय, टेक महिंद्रा, मारुती, टीसीएस या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
इस्रायल- इराण यांच्यातील युद्धबंदीमुळे मध्य पूर्वेतील तणाव निवळला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच अमेरिकन डॉलर निर्देशांकात घसरण होऊन तो ९७ च्या खाली आला. ही त्याची मार्च २०२२ नंतरची निच्चांकी पातळी आहे. या घटकांमुळे गुंतवणूकदारांच्या भावनाही मजबूत झाली.