

गरज नसताना घेतलेले कर्ज भविष्यात किती मोठ्या अडचणी निर्माण करू शकते, याचा विचार अनेकजण करत नाहीत.
गेल्या काही वर्षांत कर्ज घेणार्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आर्थिक साक्षरतेचा अभाव, आकर्षक ऑफर्स, त्वरित मंजुरी आणि कागदपत्रांची कमी पूर्तता, यामुळे अनेकजण सहजपणे कर्ज घेतात. काही वेळा सामाजिक प्रतिष्ठा, इतरांच्या बरोबरीने राहण्याची हौस किंवा क्षणिक सुखासाठीही लोक कर्ज घेतात. मात्र, ही सवय पुढे जाऊन ‘आर्थिक संकटा’चे कारण ठरू शकते.
व्याजाचा बोजा : कर्ज घेतल्यावर त्यावर व्याज द्यावे लागते. हा व्याज दर अनेकदा जास्त असते. वेळेवर हप्ते न भरल्यास दंडात्मक व्याजही आकारले जाते. त्यामुळे मूळ रकमपेक्षा अनेक पटीने जास्त पैसे परत द्यावे लागतात.
क्रेडिट स्कोअरवर परिणाम : वेळेवर हप्ते न भरल्यास किंवा कर्ज थकवल्यास क्रेडिट स्कोअर घसरतो. याचा परिणाम पुढील कर्ज मिळवण्यावर होतो. बँका आणि वित्तसंस्था अशा व्यक्तींना कर्ज नाकारतात.
मानसिक तणाव : कर्जाचा हप्ता भरण्याची चिंता, उत्पन्नात अनपेक्षित घट, नोकरी जाण्याचा धोका किंवा इतर आकस्मिक खर्च आल्यास मानसिक तणाव वाढतो. कुटुंबातील वातावरणही बिघडते.
आर्थिक स्वातंत्र्यावर गदा : नियमित हप्ते भरण्याच्या ओझ्यामुळे बचत, गुंतवणूक किंवा इतर गरजेच्या गोष्टींसाठी पैसे उरत नाहीत. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येते.
कायदेशीर कारवाईचा धोका : हप्ते थकवल्यास बँका किंवा फायनान्स कंपन्या कायदेशीर कारवाई करू शकतात. त्यामुळे मालमत्ता जप्त होण्याचा किंवा कोर्टकचेरीत अडकण्याचा धोका वाढतो. उत्पन्न थांबते.
व्यक्तीने गरज नसताना घेतलेले कर्ज फेडता न आल्यास त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. कर्ज थकबाकी वाढल्याने बँकांचे आर्थिक आरोग्यही बिघडते. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. कर्ज न फेडणार्यांची संख्या वाढल्यास बँकांना नुकसान सहन करावे लागते, जे शेवटी सर्वसामान्य ग्राहकांवरच परिणाम करते.
आपल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे मिळाल्यास, कर्ज घेण्याचा निर्णय घ्या. कर्ज हा शेवटचा पर्याय असावा, पहिला नाही. आर्थिक गरज असेल, आपली फेडण्याची क्षमता असेल आणि पर्याय नसेल, तरच कर्ज घेणे योग्य. अन्यथा, क्षणिक सुखासाठी किंवा सामाजिक दबावामुळे घेतलेले कर्ज भविष्यातील मोठ्या संकटाचे कारण ठरू शकते. म्हणूनच, कर्ज घेण्याआधी विचार करा, सजग राहा आणि आर्थिक शिस्त पाळा. आपली आर्थिक सुरक्षितता आपल्या हातात आहे!
* ही वस्तू किंवा सेवा खरंच अत्यावश्यक आहे का?
* माझ्याकडे पर्यायी मार्ग आहे का?
* कर्ज फेडण्याची माझी क्षमता आहे का?
* कर्ज न घेतल्यास काय नुकसान होईल?