Stock Market Closing Updates
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा रेपो दरात कपातीची शक्यता, अमेरिकेच्या ट्रेझरी यिल्डमध्ये घट, विदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल, कच्च्या तेलाच्या दरात घट आणि डॉलर कमकुवत झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.५ जून) सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स ४४३ अंकांनी वाढून ८१,४४२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १३० अंकांच्या वाढीसह २४,७५० वर स्थिरावला.
आज बाजाराला विशेषतः फार्मा आणि रियल्टी शेअर्समधील तेजीचा आधार मिळाला. निफ्टी फार्मा निर्देशांक १.२ टक्के आणि निफ्टी रियल्टी १.७ टक्के वाढून बंद झाला. निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटल प्रत्येकी ०.५ टक्के वाढले. बीएसई मिडकॅप ०.४ टक्के आणि स्मॉलकॅप ०.६ टक्के वाढला.
सेन्सेक्सवर इर्टनलचा शेअर्स ४.५ टक्के वाढून २५५ रुपयांवर पोहोचला. पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले.
आरबीआय शुक्रवारी पतविषयक धोरण जाहीर करणार आहे. आरबीआय सलग तिसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची शक्यता आहे. या आशेने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.
तीन सत्रांत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीवर जोर दिला होता. पण आता विदेशी गुंतवणूकदार खरेदीकडे वळले. त्यांनी ४ जून रोजी १,०७६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सलग १२ व्या दिवशी खरेदीत सातत्य कायम ठेवले. त्यांनी बुधवारी एका दिवसात २,५६६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण राहिले.
कच्च्चा तेलाची मागणी कमी झाली आहे. परिणामी, दरात जवळपास १ टक्के घसरण झाली आहे. त्यात सौदी अरेबियाने जुलै डिलिव्हरीच्या कच्च्या तेलाच्या दरात कपात केल्याने दबाव वाढला. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ६४.८५ डॉलरपर्यंत खाली आला आहे.