‘आर्थिक नियोजना’ची स्मार्ट नियमावली (Pudhari File Photo)
अर्थभान

Smart Financial Planning Guide | ‘आर्थिक नियोजना’ची स्मार्ट नियमावली

आजच्या बदलत्या जगात आपले कुटुंब आर्थिकद़ृष्ट्या मजबूत ठेवायचं असेल तर घरात येणार्‍या पैशाचं योग्य नियोजन करणे फार महत्त्वाचं आहे.

पुढारी वृत्तसेवा

आजच्या बदलत्या जगात आपले कुटुंब आर्थिकद़ृष्ट्या मजबूत ठेवायचं असेल तर घरात येणार्‍या पैशाचं योग्य नियोजन करणे फार महत्त्वाचं आहे. दरमहा पैसा येतो किती? आलेल्या पैशातून खर्च किती होतो? शिल्लक (बचत) किती ठेवतो? आणि त्या बचतीतून गुंतवणूक किती करतो, या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

जर तुमच्या घरात 100 रुपये येत असतील तर 40 रुपयांत घराचा दैनंदिन खर्च भागला पाहिजे. तुम्ही घेत असलेल्या कर्जाचे हप्ते 40 रु.पेक्षा जास्त नसावेत. कुटुंबातील सदस्यांचे विविध विम्यासाठी खर्च करताना 6 रु.पेक्षा जास्त नसावा. कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी किमान 25 ते 30 रु. गुंतवणूक केली पाहिजे. तरच तुमच्या कुटुंबाकडे आर्थिक सक्षमता भक्कमपणा येते.

मात्र, गुंतवणूक करताना काळजीपूर्वक केली पाहिजे. मिळणारा परताव्याने महागाईवर मात केली पाहिजे. समजा, महागाई 7% वाढत असेल आणि तुमचा पैसा 8% वाढत असेल तर तुमची संपत्ती निव्वळ 1% वाढत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पैसा मिळविण्यासाठी पारंपरिक गुंतवणूक करण्यापेक्षा भांडवली बाजार, म्युच्युअल फंड, बॉण्ड, एन.पी.एस., पी.एम.एस., ए.आय.एफ. अशा ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम असते. त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे.

गुंतवणूक करताना किती टक्के परतावा मिळतो हे फार महत्त्वाचे आहे. जसे प्रवास करताना वेग जास्त असेल तर कमी वेळेत जास्त अंतर कापतो, हेच गणित गुंतवणुकीत असते. पैशाच्या वाढीचा वेग जितका जास्त तितक्या कमी वेळेत मोठी संपत्ती निर्माण होते. मोठा परतावा हवा तर मोठी जोखीम घ्यावी लागते आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य प्राप्त केले पाहिजे. काही सोप्या नियमांद्वारे आर्थिक नियोजन समजून घेऊ.

1. गुंतवणुकीचे नियम :

(अ) 72 चा नियम - पैसा दुप्पट होण्याचा काळ - तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळतो, यावरून किती वर्षात माझा पैसा दुप्पट होतो हे नियम 72 वरून कळते. मिळणार्‍या व्याजाच्या दराने 72 अंकाला भागाकार केला असता, येणारे उत्तर म्हणजे दुप्पट होण्याचा कालावधी होय.

* गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे = 72 भागिले व्याजदर

* बचत खाते (3%): 72 भागिले 3 = 24 वर्षे

* पारंपरिक विमा (6%): 72 भागिले 6 = 12 वर्षे

* इक्विटी म्युच्युअल फंड (12%) 72 भागिले 12 = 6 वर्षे

(ब) 114 चा नियम

पैसा तिप्पट होण्याचा काळ समजावून घेण्यासाठी 114 चा नियम उपयोगात येतो. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळतो, यावरून आपला पैसा किती वर्षात तिप्पट होतो. यासाठी मिळणार्‍या व्याजाच्या दराने 114 अंकाला भागाकार केला असता, येणारे उत्तर म्हणजे तिप्पट होण्याचा कालावधी होय.

* गुंतवणूक तिप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे = 114 × व्याजदर

* बचत खाते (3%) : 114 भागिले 3 = 38 वर्षे

* 6% व्याजदर : 114 भागिले 6 = 19 वर्षे

* 12% व्याजदर : 114 भागिले 12 = 9.5 वर्षे

(क) 144 चा नियम

किती वर्षात पैसा चौपट होईल हे काढण्यासाठी नियम 144 चे सूत्र जाणून घ्या. तुम्ही केलेली गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळतो. यावरून तुमचा चौपट होण्याचा कालावधी कळतो. नियम 144 नुसार तुम्हास मिळणार्‍या व्याजाच्या दराने 144 अंकाला भागाकार केला असता, येणारे उत्तर म्हणजे चौपट होण्याचा कालावधी होय.

* गुंतवणूक चौपट होण्यासाठी लागणारी वर्षे = 144 भागिले व्याजदर

* 6% व्याजदर : 144 भागिले 6 = 24 वर्षे

* 12% व्याजदर : 144 भागिले 12 = 12 वर्षे

2. महागाई समजण्यासाठी नियम - प्रतिवर्षी वाढत्या महागाईमुळे पैशामधील खरेदी करण्याची शक्ती कमी कमी होत असते. उदा. 2018 मध्ये एक लिटर पाणी पिण्याची बाटली 10 रुपयाला मिळत होती. तीच 10 रु.ची नोट घेऊन तुम्ही बाजारात गेलात, तर तुम्हाला अर्धा लिटर पाण्याची बाटली विकत मिळते. याचा अर्थ मागील आठ वर्षांत 10 रु. नोटेमधील खरेदी करण्याची शक्ती 50% नी कमी झाली आहे. एक लिटर पाण्याची तहान भागविण्यासाठी तुम्हाला 20 रु. द्यावे लागतात. याचा अर्थ एका बाजूला पैशातील खरेदी करण्याची शक्ती कमी झाली आणि दुसर्‍या बाजूला वस्तूंची किंमत वाढली. त्यासाठी महागाई किती टक्क्यांनी वाढते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्या पैशाची किंमत कशी कमी होते हे समजावून घेण्यासाठी पुढील सूत्र समजावून घ्या.

* 70 चा नियम - पैशाची किंमत अर्धी होण्याचा कालावधी नियम

* महागाईमुळे पैशाची किंमत निम्मी होण्यासाठी लागणारी वर्षे = 70 भागिले महागाई दर

* सरासरी महागाई 7% गृहीत धरल्यास : 70 भागिले 7 = 10 वर्षांत पैशाची किंमत अर्धी होते.

3. निवृत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य निधी व्यवस्थापन - आयुष्याच्या संध्याकाळी आर्थिक स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे. घरात आणि समाजात मानसन्मान हवा असेल तर तुमच्याकडे पुरेसा रिटायरमेंट फंड हवा. तो किती हवा? या प्रश्नाचे उत्तर पुढील सूत्रावरून पटकन काढता येईल.

तुमच्या दर महिन्याच्या खर्चावरून वार्षिक खर्च काढा आणि त्याला 25 ने गुणाकार करा. जे उत्तर येईल तितका पैसा स्वतःसाठी शिल्लक ठेवण्यासाठी तयारीला लागा. उदा. दर महिन्याला 50,000/- खर्च असेल तर वार्षिक खर्च 6 लाख होतो. त्याला 6,00,000 गुणिले 25 = 1.50 कोटी. आजच्या इतके सन्मानाने जगण्यासाठी तुम्हाला 1.50 कोटी हवेत. त्यानुसार तुम्ही कामाला लागा.

निवृत्तीला लागणारा निधी = वार्षिक खर्च गुणिले 25

उदा. : वार्षिक खर्च 6,00,000 - निधी 1.50 कोटी

4. शंभर - वय नियम (जोखीम वाटप) : आपल्या देशातील भांडवली बाजाराने मागील 45 वर्षांत 15% हून अधिक परतावा दिला आहे. भांडवली बाजारात बाजाराची जोखीम (मार्केट रिस्क) असते. आपल्या गुंतवणुकीत किती जोखीम घ्यावी याबाबत अर्थतज्ज्ञांनी सूत्र सांगितले आहे, हे समजावून घेऊन गुंतवणूक करावी. जितके वय कमी असेल तितकी जोखीम जास्त घ्यावी. वाढत्या वयानुसार जोखीम कमी कमी करावी. त्यासाठी नियम 100 लक्षात घ्यावे. 100 मधून आपले वय वजा करून जे उत्तर येईल तितकी जोखीम घ्यावी.

* वय 30 : 100 - 30 = 70% इक्विटी, 30% डेट मार्केट आक्रमक गुंतवणूक

* वय 60 : 100 - 60 = 40% इक्विटी, 60% डेट मार्केट मध्यम गुंतवणूक

5. आपत्कालीन निधी व्यवस्थापन सूत्र - आपल्या कुटुंबावर अपघात, आजारपण, नोकरीतील बदल अशा कारणांमुळे आपत्ती येऊन घरातील उत्पन्न बंद होऊ शकते. त्यासाठी आपत्कालीन निधी व्यवस्थापन हवे. त्यासाठी दरमहा होणारा दैनंदिन खर्च, कर्जाचे हप्ते, विमा हप्ते आणि नेहमीची गुंतवणूक इतकी रक्कम किमान 6 ते 9 महिने पुरेल इतका आपत्कालीन निधी लगेच काढता येईल, असा ठेवायला हवा.

अ) आपत्कालीन निधी :

* कुटुंबाच्या 6-9 महिन्यांच्या खर्चाएवढा निधी राखावा.

* 50,000 खर्च असेल तर 3 लाख ते 4.5 लाख इतका निधी असावा.

6. विमा : कुटुंबाची सुरक्षा कुटुंब प्रमुख काम करतो. तेव्हाच दर महिन्याला पैसा घरात येतो आणि कुटुंब सुखात आनंदात नांदत असते. कुटुंब प्रमुखाने घरात आणलेल्या उत्पनाचा 20% भाग कुटुंब प्रमुखावर खर्च होतो आणि 80% रक्कम कुटुंबावर आणि भविष्यातील गरजांवर खर्च होते. जर अनपेक्षितपणे कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबाचे भवितव्य अंधकारमय होते. अशी वेळ येऊ नये म्हणून कुटुंब प्रमुखाचा जोखिमेचा विमा हवा (टर्म इन्शुरन्स घ्या). तो किती हवा याचे सूत्र खाली दिले आहे. कुटुंब प्रमुखाच्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट विमा हवा. त्याचबरोबर वैद्यकीय विमा, व्यक्तिगत अपघाती विमा हवा.

नियम : वार्षिक उत्पन्न गुणिले 20 = किमान विमा रक्कम

उदा. : कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न 5,00,000 असेल तर जोखीम विमा कव्हर 1 कोटी, अपघाती विमा 1 कोटी आणि वैद्यकीय विमा सर्व सदस्यांचा 25 लाख हवा.

7. गुंतवणुकीचे नियमस्टार्ट अर्ली - गुंतवणूक लवकर सुरू करा, वेळ हे पैशाचं गुपित आहे.

अ‍ॅसेट अलोकेशन (मालमत्तेचे वाटप) विविधीकरण करा : एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका. सर्व पैसे एकाच मालमत्तेमध्ये गुंतवणूक न करता विविध मालमत्तेमध्ये ठेवावेत.

तज्ज्ञांकडूनच सल्ला घ्या : सेबी नोंदणीकृत सल्लागारींचा सल्ला घ्या किंवा सर्टिफाईड फायनान्सियल प्लॅनरकडून आर्थिक नियोजन करून घ्यावे.

रिबॅलेन्सिंग पोर्टफोलिओ नियमित आढावा घ्या : गुंतवणूक व बाजाराच्या बदलांनुसार बदल करावा.

आर्थिक नियोजन हे एक शास्त्रशुद्ध कला आणि विज्ञान आहे. गुंतवणूक करताना वरील नियम अंगीकारल्यास नियमित बचत, योग्य गुंतवणूक आणि शिस्तबद्ध नियोजनांमुळे आर्थिक स्वातंत्र्य नक्कीच मिळवता येईल.

आजच्या बदलत्या जगात आपले कुटुंब आर्थिकद़ृष्ट्या मजबूत ठेवायचं असेल तर घरात येणार्‍या पैशाचं योग्य नियोजन करणे फार महत्त्वाचं आहे. दरमहा पैसा येतो किती? आलेल्या पैशातून खर्च किती होतो? शिल्लक (बचत) किती ठेवतो? आणि त्या बचतीतून गुंतवणूक किती करतो, या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT