Silver Price Crash Today: देशातील वायदा बाजारात आज चांदीच्या भावात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. सकाळी बाजार उघडताच चांदीने नवा इतिहास रचत 2.50 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता, पण अवघ्या काही तासांतच चित्र पालटलं. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचे दर 21 हजार रुपयांहून अधिक घसरले आणि गुंतवणूकदारांची झोप उडाली.
सकाळी 9 वाजता बाजार सुरू होताच काही मिनिटांतच चांदीत 14,387 रुपयांची वाढ झाली आणि दर 2,54,174 रुपये प्रति किलो या उच्चांकावर पोहोचले. मात्र यानंतर लगेचच गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला सुरुवात केली. दुपारी सुमारे 12.20 वाजता चांदी 21,054 रुपयांनी घसरून 2,33,120 रुपये प्रति किलोवर आली. दुपारी 1.55 वाजता ती 2,37,153 रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत होती. गेल्या आठवड्यात चांदी 2,39,787 रुपयांवर बंद झाली होती.
एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार चांदी आपल्या उच्चांकावरून 8.28 टक्क्यांनी खाली आली आहे. इतक्या कमी वेळात एवढी मोठी घसरण क्वचितच पाहायला मिळते. सकाळच्या उच्चांकानंतर अवघ्या तीन तासांतच बाजारात मोठी घसरण झाली.
पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नफा वसुली (प्रॉफिट बुकिंग). दर विक्रमी पातळीवर गेल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. दुसरं कारण आंतरराष्ट्रीय घडामोडी. रशिया-युक्रेन युद्धाबाबत शांतता चर्चेचे संकेत मिळाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून असलेली चांदीची मागणी कमी झाली.
यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील संभाव्य शांतता कराराबाबत सकारात्मक बातम्या समोर आल्या. तिसरं कारण म्हणजे जागतिक बाजारातील घसरण. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 80 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेल्यानंतर नफा वसुलीमुळे ती 75 डॉलरच्या खाली आली.
आज चांदीत मोठी घसरण झाली असली, तरी यंदा आतापर्यंत चांदीने गुंतवणूकदारांना 180 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. चालू महिन्यातच चांदी सुमारे 40 टक्के वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, औद्योगिक मागणी वाढणे आणि पुरवठ्यातील मर्यादा यामुळे आगामी काळात चांदीत वाढ होणार आहे.