Stock Market Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. आज बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी वाढून हिरव्या रंगात सुरू झाला, तर निफ्टीही जवळपास 50 अंकांनी वाढत तेजीसह उघडला.
नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारासाठी सुरुवातीचे संकेत सकारात्मक होते. गिफ्ट निफ्टी जवळपास 50 अंकांच्या वाढीसह 26,350 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. मात्र, अमेरिकेत नववर्षानिमित्त बाजार बंद असल्याने जागतिक बाजारांकडून संकेत मिळाले नाहीत. आज जगभरातील अनेक प्रमुख बाजार बंद आहेत.
दरम्यान, वर्षाच्या अखेरच्या व्यवहारात अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. सलग चौथ्या दिवशी घसरण होत डाओ जोन्स सुमारे 300 अंकांनी घसरला, तर नॅस्डॅकही जवळपास 180 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
कमोडिटी बाजारात अस्थिरता दिसत आहे. कॉमेक्सवर मार्जिन वाढवण्यात आल्याने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. चांदी जवळपास 10 टक्क्यांनी घसरून 71 डॉलर प्रति औंसखाली आली, तर सोन्याच्या दरातही सुमारे 55 डॉलरची घसरण झाली आणि भाव 4,325 डॉलरच्या आसपास बंद झाले.
देशांतर्गत बाजारातही याचा परिणाम दिसून आला. चांदी जवळपास 15 हजार रुपयांनी स्वस्त झाली, तर सोन्याच्या भावात सुमारे 1,300 रुपयांची घट झाली. बेस मेटल्समध्ये कॉपरची सलग सहा दिवसांची तेजी थांबली. निकेल, झिंक आणि लीडमध्येही दबाव दिसून आला. मात्र, अॅल्युमिनियमने उच्चांक गाठला.
कच्च्या तेलाचे दर 61 डॉलर प्रति बॅरलखाली आले. गेल्या एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 20 टक्क्यांची घसरण झाली असून, ही 2020 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण मानली जात आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) रोख बाजारात सुमारे 3,597 कोटी रुपयांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) आपली खरेदी सुरूच ठेवली असून सलग 87व्या दिवशी सुमारे 6,760 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला.
दरम्यान, तेल कंपन्यांनी विमान इंधन (ATF) दरात सुमारे 7,350 रुपये प्रति किलोलीटरची कपात केली आहे. याशिवाय ‘वन नेशन, वन ग्रिड, वन टॅरिफ’ प्रणाली लागू झाल्यामुळे राजस्थानमध्ये गॅस दरात प्रति युनिट सुमारे 3 रुपये, तर उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये सुमारे 2 रुपयांची घसरण झाली आहे.