Rule Change From October 1 Pudhari
अर्थभान

October 1 Rule Changes: 1 ऑक्टोबरपासून देशात 5 मोठे बदल होणार; LPG, ATMपासून टीव्ही-फ्रिजपर्यंत... काय काय बदलणार?

Rule Change From October 1: 1 ऑक्टोबर 2026 पासून एलपीजी, एटीएम शुल्क, एफडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी संबंधित काही महत्त्वाचे बदल होणार आहेत.

Rahul Shelke

Rule Change From October 1: सप्टेंबर महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2026 पासून देशात काही महत्त्वाचे नियम आणि दर बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या घरखर्चावर आणि खिशावर होऊ शकतो. एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क, हवाई इंधनाचे दर, टीव्ही-फ्रिज-एसीच्या किमती आणि एफडीच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

1. LPG सिलेंडरच्या दरात बदल होणार?

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यानंतर नवीन दर जाहीर केले जातात. त्यामुळे 1 ऑक्टोबरला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही महिन्यांत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत अनेकदा बदल झाले आहेत. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तुलनेने स्थिर राहिल्या आहेत.

याशिवाय, एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी आणि आधार बायोमेट्रिक पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. ज्यांनी आवश्यक पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांना एलपीजी सबसिडी मिळताना अडचणी येऊ शकतात.

काही ठिकाणी सिलेंडर वितरणासाठी ओटीपीवर आधारित पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिलेंडर घरी पोहोचल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी सांगावा लागू शकतो.

2. विमान प्रवासाच्या खर्चावरही परिणाम होऊ शकतो

एलपीजीसोबत तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एटीएफ म्हणजेच विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या किमतीतही बदल करतात.

एटीएफच्या दरात वाढ किंवा घट झाल्यास त्याचा परिणाम विमान कंपन्यांच्या खर्चावर होऊ शकतो. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम विमान प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीवरही होण्याची शक्यता असते. त्यामुळे 1 ऑक्टोबरला एटीएफचे नवीन दर काय असतील, याकडे विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांचे लक्ष असेल.

3. SBI ग्राहकांना ATM वापरणे महाग पडू शकते

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या काही ग्राहकांसाठी 1 ऑक्टोबरपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे.

BSBD म्हणजेच बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यांच्या ग्राहकांना महिन्यात चार वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी 15 रुपये आणि त्यावर GST आकारला जाऊ शकतो.

सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांसाठीही मोफत एटीएम व्यवहारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर आर्थिक व्यवहारासाठी 23 रुपये अधिक GST, तर नॉन-फायनान्शियल व्यवहारासाठी 11 रुपये अधिक GST आकारला जाऊ शकतो. त्यामुळे महिन्यात वारंवार एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त शुल्काचा सामना करावा लागू शकतो.

4. टीव्ही, फ्रिज आणि AC महाग होण्याची शक्यता

फेस्टिव्ह सीझनमध्ये टीव्ही, फ्रिज, एसी किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो.

कारण कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. तांबे, स्टील, अॅल्युमिनियम आणि कच्चे तेल यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढल्याने कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचबरोबर वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे.

यामुळे टीव्ही, फ्रिज, एसी आणि इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत 8 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष वाढ उत्पादन, कंपनी आणि मॉडेलनुसार वेगळी असू शकते.

5. FD संदर्भातील नियमांमध्ये बदल

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी करणाऱ्या ग्राहकांसाठीही 1 ऑक्टोबरपासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत.

नवीन नियमांनुसार बँकांना एफडीवरील व्याजदराची माहिती अधिक पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. बँकेच्या वेबसाइटवर व्याजदराची संबंधित माहिती स्पष्टपणे दाखवावी लागेल.

तसेच, एकाच दिवशी स्वीकारलेल्या एफडीसाठी समान प्रकारच्या ठेवींवर समान व्याजदर देण्याबाबतही नियम करण्यात आले आहेत. मोठ्या रकमेच्या ठेवींशी संबंधित व्याजदरांच्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहेत.

एकंदरीत काय बदलणार?

1 ऑक्टोबरपासून होणारे हे बदल सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चाशी संबंधित आहेत. गॅस सिलेंडर, एटीएममधून पैसे काढणे, विमान प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि एफडी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

मात्र, LPG आणि ATFचे दर दर महिन्याला बदलू शकतात. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीतील वाढ कंपनी आणि उत्पादनानुसार वेगळी असू शकते. त्यामुळे 1 ऑक्टोबरला जाहीर होणारे अधिकृत दर आणि बँकांकडून दिलेली माहिती पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT