Robert Kiyosaki Warns of Massive Stock Market Crash: जागतिक शेअर बाजारात मोठ्या घसरणीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी येत्या काळात भयानक स्टॉक मार्केट क्रॅश होण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, हा क्रॅश अनेकांसाठी संकट ठरेल, पण योग्य नियोजन केल्यास हा क्रॅश सर्वात मोठी संधी ठरू शकतो, असा दावा कियोसाकी यांनी केला आहे.
कियोसाकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, हा मोठा क्रॅश आता अगदी जवळ आला आहे. त्यांनी लिहिले की, ज्यांनी आधीच तयारी केली आहे, त्यांच्यासाठी ही घसरण प्रचंड संपत्ती निर्माण करण्याची संधी ठरू शकते. मात्र जे लोक अजूनही निष्काळजी आहेत, त्यांच्यासाठी हा काळ संकटाचा आहे.
कियोसाकी गेली अनेक वर्षे आधुनिक आर्थिक व्यवस्थेवर टीका करत आहेत. त्यांच्या मते, सध्याची जागतिक फायनान्शियल सिस्टीम ही 'बुडबुडा' आहे. बनावट पैसा आणि वाढतं कर्ज यावर ही सिस्टीम उभी आहे. त्यांनी याआधी ‘Rich Dad’s Prophecy’ या पुस्तकातही अशाच मोठ्या आर्थिक संकटाचा इशारा दिला होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार, शेअर बाजार कोसळतो तेव्हा बहुतांश गुंतवणूकदार घाबरून आपली गुंतवणूक विकून टाकतात. पण हाच काळ दीर्घकालीन विचार करणाऱ्या लोकांसाठी खरी संधी असतो. कारण मोठ्या घसरणीत चांगले शेअर्स किंवा प्रॉपर्टी स्वस्तात मिळू शकतात.
कियोसाकी यांनी सांगितले की, ते स्वतः शेअर बाजाराच्या चढ-उतारांपेक्षा 'खऱ्या मालमत्तांवर' जास्त विश्वास ठेवतात. त्यांच्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये प्रत्यक्ष सोने, चांदी आणि बिटकॉइनसारखी डिजिटल मालमत्ता आहे. बाजार आणखी खाली गेला, तर ते बिटकॉइनमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, लोक घाबरून विक्री करतात, तेव्हाच स्मार्ट गुंतवणूकदार खरेदी करतात. बाजार कोसळला की चांगल्या मालमत्ता स्वस्तात मिळतात, फक्त त्या ओळखण्याची आणि संयम ठेवण्याची गरज असते.
सध्या क्रिप्टो मार्केटमध्येही मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. बिटकॉइनने मागील काही महिन्यांत उच्चांक गाठल्यानंतर त्यात आता मोठी घसरण होत आहे. याच पार्श्वभूमीवर कियोसाकी यांनी सांगितलं की, बाजार खाली आला, तरी घाबरायचं नाही; उलट संधी म्हणून पाहायचं.
त्यांचा विश्वास आहे की, आर्थिक मंदी ही अपरिहार्य असते. पण योग्य नियोजन केलं, तर तीच मंदी संपत्ती निर्माण करण्याचं साधन बनू शकते. “क्रॅश हा शेवट नसतो, ते नव्या सुरुवातीचे संकेत असतात,” असं ते सातत्याने सांगत आले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, कियोसाकी यांची मतं थोडी आक्रमक वाटू शकतात, पण त्यामागचा मेसेज महत्त्वाचा आहे. बाजार तेजीत असताना अंधाधुंद गुंतवणूक करणं आणि बाजार पडला की घाबरणं, ही सर्वात मोठी चूक आहे. उलट, दीर्घकालीन नियोजन आणि योग्य वेळी निर्णय घेण्याची तयारी असेल, तर अशा संकटाच्या काळातही आर्थिक प्रगती करता येते.
भारतीय गुंतवणूकदारांसाठीही हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नव्या लोकांनी शेअर बाजारात प्रवेश केला आहे. अनेकजण अल्पकालीन नफ्यावर लक्ष केंद्रित करतात. मात्र अशा जागतिक घसरणीच्या काळात संयम, विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार आणि जोखीम समजून निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.