RBI Online Fraud Compensation Pudhari
अर्थभान

RBI New Rules: ... तर तुम्हाला मिळणार 25,000 रुपये; RBI ने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन नियम आणि अटी

RBI Online Fraud Compensation: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी RBI ने नवीन धोरण जाहीर केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

RBI Online Fraud Compensation: ऑनलाइन फसवणूक आणि UPI घोटाळ्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्यास ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना ₹25,000 पर्यंत मोबदला मिळू शकणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना RBI ने 24 जून 2026 रोजी जारी केली असून, हा नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे.

कोणत्या व्यवहारांना लागू होणार नियम?

नवीन नियम बहुतांश व्यावसायिक बँकांवर लागू असतील. मात्र स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि स्थानिक क्षेत्र बँकांना यामधून वगळण्यात आले आहे.

या नियमांत पुढील सर्व डिजिटल व्यवहारांचा समावेश असेल:

  • UPI व्यवहार

  • नेट बँकिंग

  • मोबाईल बँकिंग

  • डेबिट कार्ड व्यवहार

  • क्रेडिट कार्ड व्यवहार

  • ऑनलाइन कार्ड पेमेंट

  • Tap/Swipe द्वारे केलेले व्यवहार

फसवणुकीची जबाबदारी कोणाची?

RBI ने स्पष्ट केले की प्रत्येक प्रकरणात जबाबदारी निश्चित केली जाईल. फक्त ग्राहकांची चूक होती असे सांगून बँका जबाबदारी झटकू शकणार नाहीत. आवश्यक पुरावे सादर करणे बँकेसाठी बंधनकारक असेल.

RBI ने सांगितलेल्या तीन महत्त्वाच्या अटी

1. बँकेची चूक असल्यास

जर बँकेच्या सुरक्षेतील त्रुटी, तांत्रिक बिघाड किंवा फसवणुकीबाबत सूचना न देण्यामुळे नुकसान झाले असेल, तर ग्राहकाला संपूर्ण रक्कम परत दिली जाईल.

2. थर्ड पार्टीमुळे फसवणूक झाल्यास

पेमेंट अॅप, पेमेंट गेटवे किंवा दूरसंचार सेवा कंपनीमुळे फसवणूक झाली असेल आणि ग्राहकाने पाच दिवसांच्या आत बँकेत तक्रार केली, तर ग्राहकाला पूर्ण मोबदला मिळू शकतो.

3. ग्राहकाची चूक असल्यास

जर ग्राहकाने OTP शेअर केला, फिशिंग लिंकवर क्लिक केले किंवा संशयास्पद अॅप डाउनलोड केले असेल, तरीही काही परिस्थितीत मोबदला मिळू शकतो. मात्र त्यासाठी नुकसान मर्यादित असणे आणि तातडीने तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.

किती मिळणार मोबदला?

RBI च्या नियमानुसार एका ग्राहकाला आयुष्यात केवळ एकदाच मोबदला दिला जाईल. मोबदल्याची मर्यादा ₹25,000 किंवा नुकसानाच्या 85 टक्के रक्कम, यापैकी जी कमी असेल ती दिली जाणार आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची ₹50,000 ची ऑनलाइन फसवणूक झाली, तर त्याला जास्तीत जास्त ₹25,000 पर्यंतच मोबदला मिळेल. भविष्यात पुन्हा फसवणूक झाल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मोबदल्याचा खर्च कोण उचलणार?

₹29,412 पर्यंतच्या फसवणुकीत:

  • RBI – 65%

  • संबंधित बँक – 10%

  • लाभार्थी बँक – 10%

  • उर्वरित हिस्सा नियमानुसार निश्चित केला जाईल.

₹29,412 ते ₹50,000 पर्यंतच्या नुकसानात:

  • RBI – ₹19,118

  • ग्राहकाची बँक – ₹2,941

  • लाभार्थी बँक – ₹2,941

ग्राहकांनी काय करावे?

ऑनलाइन फसवणूक झाल्यास वेळ न दवडता संबंधित बँकेला माहिती द्या आणि अधिकृत तक्रार नोंदवा. शक्य असल्यास पाच दिवसांच्या आत तक्रार केल्यास मोबदला मिळण्याची शक्यता अधिक राहील.

टीप: हा मोबदला RBI ने जाहीर केलेल्या अटी व पात्रतेनुसारच दिला जाईल. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT