Raj Thackeray-Uddhav Thackeray Meet: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
महापालिकेच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा कार्यक्रम 23 जानेवारीला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.
संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे करणार आहेत. त्यामुळे या सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई आणि मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले होते. जुलै 2025 मध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात दोघे एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीदरम्यानही दोघांनी शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेतली होती.
आता निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम असला तरी, ठाकरे कुटुंबाच्या एकत्र येण्याला राजकीय अर्थही आहे. त्यामुळे 23 जानेवारीच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू काय भूमिका मांडतात, पुढील राजकीय दिशा काय असणार आहे, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.