

मृणालिनी नानिवडेकर
महापालिका निवडणूक निकालांनी मुंबईतील राजकारणात मोठे बदल घडवले असले, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आणि भावनिक मराठी मतदारांची मिळणारी साथ अजून टिकून आहे. पराभव असूनही उद्धव ठाकरे यांची आक्रमक लढाई आणि भविष्यातील पुनर्बांधणीची शक्यता या निकालांतून स्पष्ट होते. सत्तेबाहेर गेल्यानंतरचा पुढचा राजकीय प्रवासच आता निर्णायक ठरणार आहे.
अनेक वर्षांच्या प्रशासकराजनंतर राज्यातील 29 महापालिका निवडणुका अखेर आटोपल्या. निकाल लागले. आता महापौरपदासाठीची सोडत निघेल, आरक्षण कळेल. मुंबईला, ठाण्याला, नाशिकला, नागपुरला, परभणीला, भिवंडीला, मालेगावला व इतरही ठिकाणी नवा महापौर मिळेल. नवनिर्वाचित नगरसेवक जनतेचे भले करण्याच्या शपथा घेतील. त्या पाळतात का ते दिसेल; पण नवे कारभारी कामाला लागतील. रस्ते स्वच्छता, गटारे तुंबू नयेत याची काळजी घेतील. किमान ती घेतली जातेय, असे चित्र निर्माण करतील. कचरा व्यवस्थापन, मुबलक पाणीपुरवठा याची चित्रे चितारतील. पाच वर्षे सेवा करत पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न रचतील. ही सर्व प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आजच्या निकालामागची कारणे नेमकी काय आहेत, निकालात नेमके काय झाले ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुंबई आणि महामुंबईच्या एमएमआरडीएत भाजप मोठा ठरला, हे एक केंद्रस्थानी असलेले सूत्र. बाकी निकाल वेगवेगळे लागले, त्या वेगवेगळ्या कहाण्यांची ही छोटी विश्लेषणे, वेगवेगळी!
प्रथम अर्थातच मुंबई. ठाकरे ब—ँडच्या 20 जागा मुंबईत कमी झाल्या. उद्धव ठाकरे नाराज भाऊ राज ठाकरे यांना राजी करत समवेत घेऊन आले तेव्हाच बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे मुंबईकर सुखावले होते. एकत्र कुटुंब भारतीयांना आवडते. एकनाथ शिंदे यांचे बंड कमालीचे यशस्वी झाले होते, नगरसेवक सोडून गेले होते तरी सामान्य शिवसैनिकाला ठाकरेंचे वारसदार ठाकरेच असावेत असे वाटते, हे मुंबईच्या निकालांनी दाखवून दिले. नोकरी-उद्योग मिळवलेली, व्यापार उदिमात उभी राहिलेली कोकणी चाकरमानी मंडळी आजही ठाकरेंना मानतात. त्यांना मराठीबहुल भागात मते देतात हे स्पष्ट झाले.
भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याला जिथे भले भले कचरतात, तिथे उद्धव ठाकरे लढायला उभे राहिले. ‘माझ्या राजाला साथ द्या’ हे एका निवडणुकीदरम्यान राज यांचे प्रचारगीत. ‘माझ्या भावा रे साथ दे’ असे शब्द बदलवत उद्धव टाळी द्यायला पुढे आले, भावाने टाळीसाठी हात देताच त्यांनी राजला थेट आलिंगनच दिले. या घट्ट मिठीची दिठी मराठी माणसाला भावली. मुंबईच्या मराठीबहुल भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मशाल चेतवली. आव्हान चांगले जोरदार झाले. कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे दमदार कामगिरी नोंदवतात. 2014 मध्ये स्वबळावर विधानसभा निवडणुकीत उतरणे असेल की 2019 साली अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल ठाकरेंच्या कथनानुसार दिलेल्या आश्वासनाचा भाजपने न पाळलेला शब्द. आव्हान असले की उद्धव ठाकरे संपूर्ण ताकदीनिशी उतरतात. यावेळी ठाकरे 20 ने खाली घसरल्याने मुंबईत सरळ गणित पाहिले तर तसे हरले. पण या हरण्यातले शौर्य लक्षणीय आहे. उद्धव ठाकरेंच्या तुलनेत राज ठाकरेंच्या मनसेची कामगिरी तितकी चांगली झालेली आकड्यांमध्ये तरी दिसून येत नाही.
ठाकरेंच्या दुसर्या पिढीने आदित्य ठाकरे यांनी त्यांचे चुलतभाऊ अमित ठाकरे यांना ‘मनसे’ आणि राजकीय समज असलेले मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना ‘दिलसे’ बरोबर घेतले, महाराष्ट्र पिंजून काढला तर 2029 पर्यंत पक्ष दमदारपणे उभा राहू शकेल. सध्याचे मराठी भावनिकपण व्यापक विकासाच्या संकल्पनेकडे वळवता येईल. विरोध तीव— करायचा असेल तर त्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरावे लागेल. मंत्रालय हातातून गेले आहेच. महापालिकेची चावीही आता कमरेला नाही. अशा वेळी ‘पुनश्च हरी ओम’ करायचे असते. या निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईबाहेर फारसे कुठेही गेले नाहीत. मुंबई राखणे महत्त्वाचे होतेच; पण निदान परभणीची माहिती ऐकून ते तिथे प्रचाराला गेले असते तर यशाचे मानकरी ठरले असते. आदित्य उत्तम बोलतात, या नव्या पिढीचे नेते अन्य पक्षाकडे नाहीत. अशा वेळी स्वतःचा प्रताप नोंदवायचा असतो. शिवाजी पार्कवरील सभेमध्ये त्यांनी केलेल्या नकलेचा भाग वगळला तर ते उत्तम बोलले. नक्कल करून यशस्वी होता येत नाही, हे काकांना विचारले तर समजेल, असा टोमणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगावला. पण थेट फडणवीसांनी दखल घेतली हे महत्त्वाचे. पक्ष उभा करायचा असेल तर मेहनत करणे आवश्यक.
बाकी बृहन्मुंबई भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला. नवी मुंबईत भाजपचे आव्हान मोठे ठरले. आता गणेश नाईक मोठे ठरतील. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही महामुंबईत आपली ताकद दाखवून दिली. आता मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे वर्चस्वाची लढाई आहे. शेअरचे भाव खाली-वर जावेत तसे भाजप-शिंदे सेनेचे नगरसेवकांचे संख्याबळ खालीवर होते आहे. हे बरे नाही. जनतेने निवडून दिले ते प्रश्न सोडवण्यासाठी, आपापसात वाद घालण्यासाठी नव्हे. जनतेने कौल दिला आहे, तो स्वीकारून जनसेवेला प्रारंभ करणे दूर; सध्या आपापले संख्याबळ वाढवून ते फुगवण्याची अहमहमिका लागली आहे. मराठीपण, विकास हे मुद्दे संपले. ते बरे असे वाटेल. कारण आता नगरसेवक पळवणे, ते कोंडून ठेवणे असे प्रकार सुरू झाले आहेत, असे जनतेला वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत कित्येक काळे दिवस आले. आता ते संपावेत, असे वाटत असताना सुरू काय आहे तर चढाओढ. ही चढाओढ विकासासाठी नाही तर आपापले पक्ष मोठे करण्यासाठी आहे. एकत्र सत्तेसाठी यायचे आणि मग पुन्हा विस्तारासाठी पावले टाकत राहायचे हा प्रकार जनता फार दिवस सहन करणार नाही. भाजप स्वतःची शक्ती जाणून आहे. आगळीक केली तर काय होते हे जनता जाणते आणि एकनाथ शिंदेही जाणतात. त्यामुळे आता पुरे हे समजून घेत कामाला लागलेले बरे.
जेथे काँग्रेसची शक्ती आहे तेथे त्यांना यश मिळाले. राज्यात विविध महापालिकांमध्ये खा. असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तिहादुल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचा विस्तार झाला आहे. अल्पसंख्याकांचे राजकारण हा नवा मुद्दा आहे. तो चिंतेचा आहे की कसा ते पुढील काळात कळणार आहे. पक्षविस्तार हे स्वप्न ठरवावे आणि प्रत्यक्षात आणावे. भाजपने मुंबईत क्रमांक एक पटकावला. सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. तरीही, पक्षाने शंभरी गाठली असती तर यशाची झळाळी लाभली असती. नवे कारभारी आता काय करतात ते दिसेल.