Preity Zinta IPL Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही अभिनयाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही सक्रिय आहे. आयपीएलमधील पंजाब किंग्स या संघाची ती सहमालक आहे. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सने थेट अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेमुळे प्रीती झिंटाला मोठा आर्थिक फायदा झाला.
आयपीएलमधून प्रीती झिंटाची कमाई अनेक मार्गांनी होते. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील मोठा वाटा संघमालकांना मिळतो. साधारणपणे तिकीट विक्रीच्या उत्पन्नातील सुमारे 80 टक्के हिस्सा संघमालकांच्या वाट्याला येतो. याशिवाय संघाच्या स्पॉन्सरशिपमधूनही मोठी कमाई होते.
प्रीती झिंटा 2008 साली पंजाब किंग्सची सहमालक बनली होती. त्यावेळी हा संघ सुमारे 76 मिलियन डॉलरला विकत घेण्यात आला होता. पुढील काही वर्षांत आयपीएलची लोकप्रियता आणि व्यावसायिक मूल्य झपाट्याने वाढले. 2022 पर्यंत या संघाची किंमत सुमारे 925 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचली. 2008 मध्ये प्रीती झिंटाने या संघात अंदाजे 35 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार आज या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 350 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
प्रीती झिंटाची एकूण संपत्तीही वाढली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार तिची नेटवर्थ सुमारे 183 कोटी रुपये आहे. अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट आणि विविध व्यावसायिक गुंतवणुकीतून तिला चांगले उत्पन्न मिळते. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती सुमारे दीड कोटी रुपये मानधन घेते, अशीही चर्चा आहे.
रिअल इस्टेटमध्ये प्रीती झिंटा आघाडीवर आहे. मुंबईत तिचे सुमारे 17 कोटी रुपये किमतीचे घर आहे. शिमल्यातही तिचे एक आलिशान घर असून त्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय अमेरिकेतील बेव्हरली हिल्समध्येही तिचा बंगला आहे.
प्रीती झिंटाने जीन गुडइनफ यांच्याशी विवाह केला असून ती पतीसह लॉस एंजेलसमध्ये राहते. ती दोन मुलांची आई आहे. प्रीती झिंटा लवकरच ‘लाहोर 1947’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात ती सनी देओल सोबत चित्रपटात दिसणार असून चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहे, तर दिग्दर्शनाची धुरा राजकुमार संतोषी यांच्याकडे आहे.