PNB Fraud Case: देशातील सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह सरकारी बँकांपैकी एक असलेली पंजाब नॅशनल बँक (PNB) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे 2,434 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार. पीएनबीने स्वतः ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) दिली असून हा घोटाळा कोलकात्यातील श्रेय ग्रुपच्या दोन कंपन्यांशी संबंधित आहे.
पीएनबीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, हा गैरव्यवहार दोन वेगवेगळ्या कर्ज खात्यांमध्ये झाला आहे.
श्रेय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड – सुमारे 1,241 कोटी रुपये
श्रेय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड – सुमारे 1,193 कोटी रुपये
दोन्ही रक्कम मिळून एकूण घोटाळ्याची रक्कम 2,434 कोटी रुपये इतकी आहे. बँकेने या प्रकरणाला ‘बॉरोइंग फ्रॉड’ म्हणजेच कर्ज घेताना किंवा कर्जाचा वापर करताना झालेली फसवणूक असे सांगितले आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर, बँक जेव्हा एखाद्या कंपनीला विशिष्ट प्रकल्पासाठी कर्ज देते, तेव्हा त्या पैशाचा वापर त्याच कामासाठी होणे अपेक्षित असते. पण जर तो पैसा दुसऱ्या कामासाठी वापरला गेला, इतर कंपन्यांकडे वळवला गेला किंवा नियम डावलून खर्च केला गेला, तर ती फसवणूक मानली जाते.
श्रेय ग्रुपची स्थापना 1989 मध्ये झाली होती. सुरुवातीला ही कंपनी बांधकाम क्षेत्रातील यंत्रसामग्रीसाठी वित्तपुरवठा करत होती. मात्र हळूहळू कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि कर्ज फेडण्यात ती अपयशी ठरली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की ऑक्टोबर 2021 मध्ये RBI ला हस्तक्षेप करावा लागला. सुमारे 28 हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते.
बँक घोटाळ्याची बातमी आली की सर्वसामान्य खातेदारांची चिंता वाढते. मात्र या प्रकरणात PNB ने दिलासा देणारी माहिती दिली आहे. बँकेने या संपूर्ण थकबाकीसाठी 100 टक्के प्रोव्हिजनिंग आधीच केलेली आहे. म्हणजेच, हे पैसे परत मिळाले नाहीत तरी बँकेच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही.
2018 मध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोकसी प्रकरणामुळे पीएनबी आधीच मोठ्या घोटाळ्यात अडकली होती. त्या वेळी लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) चा गैरवापर झाला होता. मात्र सध्याचा घोटाळा वेगळा आहे. हा कॉर्पोरेट कर्जाशी संबंधित असून ट्रेड फायनान्सशी त्याचा थेट संबंध नाही. सकारात्मक बाब म्हणजे, बँकेने वेळेत हा प्रकार ओळखून नियमांनुसार अहवाल दिला आहे.
या बातमीच्या आधी पीएनबीच्या शेअरमध्ये थोडी घसरण झाली होती. मात्र दीर्घकालीन चित्र पाहिलं, तर गेल्या तीन वर्षांत पीएनबीच्या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 144 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या फारशी भीती नाही.