PM Kisan 22nd Installment Date Update Pudhari
अर्थभान

PM Kisan Yojana: PM किसानचा 22वा हप्ता कधी येणार? काही शेतकऱ्यांची नावं वगळली जाणार; कोणाला लाभ मिळणार नाही?

PM Kisan 22nd Installment Date Update: PM किसान योजनेचा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पुनर्तपासणी, ई-केवायसी आणि जमीन पडताळणीमुळे काही नावे लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात.

Rahul Shelke

PM Kisan 22nd Installment Date Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेचा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसी आणि इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.

मात्र, यावेळी सरकारने मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची पुनर्तपासणी केली आहे. जमीन नोंदींची पडताळणी, ई-केवायसी आणि पात्रतेचे निकष तपासल्यानंतर काही नावे यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.

PM किसान सन्मान निधी योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये अशी आर्थिक मदत दिली जाते. वर्षभरात एकूण 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना 2018 मध्ये सुरू झाली असून आतापर्यंत 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आला होता.

पुनर्तपासणीत नावे का वगळली जात आहेत?

22 व्या हप्त्यापूर्वी सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी तपासणी मोहीम राबवली आहे. पहिला निकष म्हणजे जमीन नोंदींची पडताळणी. 1 फेब्रुवारी 2019 नंतर नावावर जमीन नोंदवलेल्या प्रकरणांची तपासणी होत आहे. जमीन मालकी हा या योजनेचा प्रमुख निकष असल्याने नोंदीत विसंगती आढळल्यास लाभार्थ्याचे नाव वगळले जाऊ शकते.

दुसरा निकष म्हणजे “एका कुटुंबातून एकच लाभार्थी” हा नियम. पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले यांना एक कुटुंब मानले जाते. जर एका कुटुंबातील दोघेही हप्ता घेत असल्याचे आढळले, तर त्यातील एकाचा लाभ थांबवण्यात येत आहे.

पात्र लाभार्थी यादी कशी तपासावी?

लाभार्थी आपले नाव तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊ शकतात.
होमपेजवर ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर कॅप्चा कोड आणि नोंदणी क्रमांक टाकून माहिती पाहता येते. माहिती अपडेट करण्यासाठीही वेबसाइटवर स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहे.

22 वा हप्ता कधी मिळणार?

केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, 22 वा हप्ता या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. एकूणच, यावेळी हप्ता मिळण्यापूर्वी लाभार्थ्यांनी आपली पात्रता, जमीन नोंदी आणि ई-केवायसीची स्थिती तपासून घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT