Pen Cooperative Urban Bank pudhari photo
अर्थभान

Pen Cooperative Urban Bank Scam : ठेवीदारांना मोठा दिलासा

४२ हजार ठेवीदारांना १० टक्के पर्यंतचा परतावा मिळणार

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेतील घोटाळ्यानंतर गेल्या दीड दशकाहून अधिक काळ आपल्या हक्काच्या पैशांसाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या हजारो ठेवीदारांच्या संघर्षाला अखेर मोठे यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. सुमन शाम आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठाने 'डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन'चाआक्षेप फेटाळून लावत प्रामाणिक ठेवीदारांच्या बाजूने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळे बँकेतील पंचवीस हजार रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या ४२ हजार ४८२ मध्यम व मोठ्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधितांना ठेवींच्या १० टक्के अथवा कमाल १ लाख रुपयांच्या मर्यादेत रक्कम वितरित करण्याचे थेट निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती पेण अर्बन बँक ठेवीदीर व खातेदार संघर्ष समितीचे कार्यवाह नरेन जाधव यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली आहे.

पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे कार्यवाह नरेन जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा आक्षेप फेटाळून लावला. यापूर्वी बँकेतील १ लाख १५ हजार छोट्या ठेवीदारांना २६.९४ कोटी रुपयांची परतफेड पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आता मध्यम व मोठ्या खातेदारांच्या परताव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बँकेच्या ३१ मार्च २०२५ अखेरच्या अधिकृत वर्गवारीनुसार, पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त ठेव असणाऱ्या ४२ हजार ४८२ ठेवीदारांची एकूण ठेव रक्कम तब्बल ५८३ कोटी ८५ लाख १० हजार ९४७ रुपये इतकी आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार प्रत्येकाला त्याच्या ठेवीच्या १० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

१५० मालमत्तांच्या विक्रीतून ठेवीदारांचे पैसे सव्याज परत मिळणे शक्य -नरेन जाधव

बँकेच्या ताब्यात असलेल्या १५० मालमत्तांची योग्य प्रकारे विक्री झाल्यास १,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल होऊ शकते आणि त्यातून १ लाख ३१ हजार ९७६ या सर्व ठेवीदारांचे पैसे सव्याज परत करणे शक्य असल्याचे नरेंन जाधव यांनी सांगीतले. सध्या कर्जवसुलीतून काही रक्कम जमा झाली असून, एकूण १५० मालमत्तांपैकी १२ मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम विक्रीसाठी हाती घेण्यात आले आहे. मात्र, विक्रीच्या प्रक्रियेतकायदेशीर हरकती आणि अडचणी निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT