‘एनपीएस’ची नवी योजना Pudhari File Photo
अर्थभान

मुलांसाठी ‘एनपीएस’ची नवी योजना, जाणून घ्या त्याविषयी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पातून योजना सुरू करण्याची घोषणा

पुढारी वृत्तसेवा
जयदीप नार्वेकर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सलग सातव्या अर्थसंकल्पात ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ म्हणजेच ‘एनपीएस’संदर्भात आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात एकीकडे एनपीएस खात्यावरील कर कपातीची मर्यादा वाढवण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुलांसाठी ‘एनपीएस वात्सल्य योजना’ ही नवी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

संसदेत 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या पेन्शन योजनेअंतर्गत आई आणि वडील त्यांच्या मुलांसाठी पैसे गुंतवू शकतील. जेव्हा मूल प्रौढ किंवा सज्ञान होईल म्हणजेच वयाची 18 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा त्याचे एनपीएस खाते नियमित खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते.

‘एनपीएस वात्सल्य योजना’ सरकारी पेन्शन योजनेंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश 18 वर्षांखालील मुलांची बचत वाढवणे आणि त्यांच्या भविष्यासाठी आगाऊ रक्कम गुंतवणे, हा आहे. ‘एनपीएस वात्सल्य योजना’ ही एनपीएस योजनेसारखीच आहे. या योजनेंतर्गत, मुलाचे जन्मदाते किंवा त्यांचे इतर कोणतेही पालक मुलाच्या नावावर एनपीएस खाते उघडू शकतात आणि त्यांच्या निवृत्तीनंतरच्या बचतीसाठी पैसे गुंतवू शकतात.

एनपीएस योजना 2004 मध्ये सुरू झाली. सेवानिवृत्तीनंतर लोकांना उत्पन्न मिळवून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये गुंतवणुकीतून होणारी करबचत इतर योजनांपेक्षा जास्त आहे. एनपीएस योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणअंतर्गत येते. या योजनेंतर्गत तुम्ही इक्विटी, कॉर्पोरेट बाँडस्, कर्ज आणि सरकारी सिक्युरिटीज यांसारख्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करू शकता. आपण काय आणि किती गुंतवणूक करावी, हे ठरवण्यास मोकळे असतो. मालमत्ता वर्गीकरणासाठी आपल्याला दोन प्रकारचे स्वातंत्र्य असते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठे आणि किती गुंतवणूक करायची ते निवडू शकता. याला अ‍ॅक्टिव्ह चॉईस म्हणतात. दुसरा पर्याय ऑटो चॉईसचा आहे. याअंतर्गत तुमच्या वयानुसार, कोणत्या मालमत्तेत किती पैसे गुंतवायचे हे तुमचा पेन्शन फंड व्यवस्थापक ठरवतो.

या योजनेनुसार, 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यावर तुमच्याकडे असलेल्या निधीपैकी 60 टक्के निधी तुम्हाला लगेच मिळतो; तर उर्वरित 40 टक्के निधी अ‍ॅन्युईटी स्कीममध्ये गुंतवावा लागतो. अ‍ॅन्युईटी योजनेवर दरमहा मिळणारे व्याज दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होत राहते. एनपीएस दोन प्रकारची खाती प्रदान करते. ‘टियर-1’ हे प्राथमिक पेन्शन खाते आहे, ज्यामध्ये पैसे काढण्यावर बंधने आहेत, तर ‘टियर-2’ हे उच्च तरलता असलेले ऐच्छिक बचत खाते आहे. एनपीएससाठी अ‍ॅन्युईटी स्कीममध्ये किती व्याज मिळेल, हे फंड हाऊसवर म्हणजेच ही सुविधा पुरवणार्‍या कंपन्यांवर अवलंबून असते. एनपीएस खात्यांतर्गत सरासरी 9% ते 12% वार्षिक व्याज मिळते, तर सर्वसाधारणपणे अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमअंतर्गत, तुम्हाला सुमारे 8 टक्के व्याज मिळते.

फायदेशीर गोष्ट अशी आहे की, जर तुम्ही एनपीएसअंतर्गत खाते उघडून 10,000 रुपये इक्विटीमध्ये गुंतवले असतील, जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे असाल आणि शेअर बाजारात मोठी तेजी आली असेल आणि तुम्ही ज्या इक्विटीमध्ये गुंतवणूक केली असेल, त्यामध्ये शंभर टक्के परतावा मिळाला असेल, तेव्हा गुंतवणुकीचे अनेक पटींनी फायदे मिळू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT