पुढारी ऑनलाईन डेस्क
अर्थसंकल्पातील (Budget 2024) एका घोषणेने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि.२३) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेंगमेंटवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आजच्या ट्रेडिंग सत्रात (stock market) सेन्सेक्स (Sensex) सुमारे ९०० अंकांनी घसरून ७९,५१४ पर्यंत खाली आला. दरम्यान, दुपारच्या सत्रात सेन्सेक्सची घसरण कमी होऊन तो ८०,४०० वर गेला. तर निफ्टी (Nifty) २४,४५० च्या खाली आला. (Union Budget Impact on Stock Market)
सिक्युरिटीजमधील ऑप्शनच्या विक्रीवर एसटीटीचा दर ऑप्शन प्रीमियमच्या ०.०६२५ टक्क्यांवरून ०.१ टक्क्यांपर्यंत आणि सिक्युरिटीजमधील फ्युचर्सच्या विक्रीवर ०.०१२५ टक्क्यांवरून ०.०२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येत आहे. ज्यात अशा फ्युचर्सचे ट्रेडिंग केले जाते,” असे सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.
सध्याच्या नियमानुसार, विक्रीच्या बाजूने फ्युचर्सवर ०.०१२५ टक्के एसटीटी लावला जातो. तर ऑप्शन्सच्या बाजूने खरेदी केलेल्या आणि वापरलेल्या पर्यायांच्या अंतर्गत मूल्यावर ०.१२५ टक्के एसटीटी लागू केला जातो. शॉर्टेड केलेल्या ऑप्शन्ससाठी प्रीमियमवर ०.०६२५ टक्के एसटीटी आकारला जातो.
सरकारला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये रिटेल गुंतवणूकदारांची वाढत्या संख्येची सरकारला चिंता आहे. गेल्या ५ दिवसांत डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग पाचपटीने वाढलाय. त्यासाठी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने F&O ट्रेडिंगवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढीचा प्रस्ताव अर्थसंकल्पातून मांडला. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये रिटेल गुंतवणूकदारांच्या वाढत्या स्वारस्याबद्दल आर्थिक सर्वेक्षणातूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच F&O ट्रेडिंगमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग हा माणसांच्या जुगार प्रवृत्तीमुळे चालत असल्याचेदेखील आर्थिक सर्वेक्षणातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
हल्लीच सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनीही गुंतवणूकदारांना F&O वर मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध केले होते. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनीही रिटेल गुंतवणूकदारांना F&O ट्रेडिंगच्या वाढत्या जोखमीबाबत सावध केले आहे.
सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा एक थेट कर आहे जो स्टॉक एक्स्चेंजवर इक्विटी शेअर्स, डेरिव्हेटिव्ह्ज (फ्यूचर्स आणि ऑप्शन्स) आणि इक्विटी म्युच्युअल फंडांच्या युनिट्सवर सिक्युरिटीजच्या विक्रीवर आकारला जातो. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सुधारित करण्यात आला आहे. तो ०.०२ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, F&O सेगमेंटमधील मासिक उलाढाल मार्च २०१९ मध्ये २१७ लाख कोटी रुपये होती. ती मार्च २०२४ मध्ये ८,७४० लाख कोटी रुपयांवर पोहोचली. या सेगमेंटचा विस्तार त्याच्या मोठ्या वाढीवरून दिसून येतो.