Milk Price Hike 2026 Pudhari
अर्थभान

Milk Price Hike 2026: नंदिनी, अमूल आणि आता मदर डेअरीने दुधाचे दर वाढवले; दरवाढीमागचं खरं कारण काय?

Milk Price Hike 2026: मदर डेअरीने १२ नोव्हेंबरपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rahul Shelke

Milk Price Hike 2026: सर्वसामान्यांच्या घरातील रोजच्या खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. आधी नंदिनी डेअरीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्या. त्यानंतर आता मदर डेअरीनेही दूध महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दुधाच्या विविध प्रकारांच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

ही दरवाढ १२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. मदर डेअरीच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान, अमूलकडूनही दुधाच्या किमती वाढवल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मदर डेअरीचे दूध किती महागले?

मदर डेअरीने दुधाच्या विविध प्रकारांच्या किमतीत वाढ केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बल्कमध्ये मिळणाऱ्या टोन्ड दुधाचा दर प्रतिलिटर ५८ रुपयांवरून ६० रुपये झाला आहे. पिशवीतील फुल क्रीम दुधाचा दर ७२ रुपयांवरून ७६ रुपये करण्यात आला आहे.

टोन्ड दूध आता ६० रुपयांऐवजी ६२ रुपये प्रतिलिटर मिळेल. डबल टोन्ड दुधाचा दर ५४ रुपयांवरून ५६ रुपये झाला आहे. तर गायीच्या दुधासाठी आता प्रतिलिटर ६२ रुपयांऐवजी ६५ रुपये मोजावे लागतील. मदर डेअरीने यापूर्वी १४ मे २०२६ रोजी दुधाचे दर वाढवले होते. त्याआधी एप्रिल २०२५ मध्ये दरवाढ करण्यात आली होती.

अमूलचे तूप आणि बटरही महागले

अमूल ब्रँडची उत्पादने विकणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने २ नोव्हेंबरपासून तूप आणि बटरचे दर वाढवले आहेत. अमूलच्या ५०० ग्रॅम टेबल बटरची किंमत ३१० रुपयांवरून ३२५ रुपये झाली आहे. एक लिटर अमूल तुपासाठी आता ६८० रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत ६३० रुपये होती. अमूल गायीच्या तुपाचा दरही ६९५ रुपयांवरून ७३५ रुपये प्रतिलिटर झाला आहे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ महागण्यामागचे कारण काय?

दूधाचे भाव वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याचा खर्च वाढला आहे. जनावरांच्या चाऱ्याचे दर, वाहतुकीसाठी लागणारे डिझेल आणि पॅकिंगचा खर्चही वाढला आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये जनावरांच्या खाद्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.

यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याने दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा दूध उत्पादन वाढण्याचा काळ मानला जातो. मात्र, यंदा या काळातही पुरवठा कमी राहण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. सणासुदीच्या काळात दुधाची मागणी वाढली आहे. नैसर्गिक दुधापासून तयार होणाऱ्या पनीरची मागणी वाढल्याचाही परिणाम बाजारावर होत आहे.

महाराष्ट्रातही ऑगस्टमध्ये गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक आणि प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे देशभरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता सर्वसामान्य ग्राहकांच्या घरखर्चावर होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT