

Air India Flight Hijack Threat: कोलकाता येथून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बुधवारी सकाळी हायजॅकची धमकी मिळाल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानाच्या स्वच्छतागृहातील आरशावर हायजॅक करण्यासंदर्भातील धमकीचा मेसेज लिहिलेला आढळला. या घटनेची माहिती मिळताच विमानाच्या वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (ATC) याबाबत कळवले. विशेष म्हणजे, विमान मुंबईकडे उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच हा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI 772 हे विमान कोलकाता येथून मुंबईकडे जाणार होते. एअरबस A320neo प्रकारातील या विमानात एकूण 93 प्रवासी बसले होते. विमान उड्डाण करण्याच्या काही वेळ आधी विमानाच्या स्वच्छतागृहात हा संशयास्पद मेसेज आढळून आला. स्वच्छतागृहातील आरशावर हायजॅक करण्याची धमकी देणारा मजकूर लिहिलेला होता.
विमानातील कर्मचाऱ्यांच्या किंवा वैमानिकाच्या निदर्शनास हा मेसेज आल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने एटीसीला माहिती देण्यात आली.
या घटनेमुळे विमानातील 93 प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. विमानाच्या स्वच्छतागृहातील आरशावर नेमका कोणत्या स्वरूपाचा मेसेज लिहिण्यात आला होता, त्यामागे कोणाचा हात आहे आणि ही धमकी खरोखरच गंभीर होती की केवळ खोडसाळपणा, याबाबत अद्याप स्पष्टत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत विमानतळ प्रशासनाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. धमकीचा मेसेज आढळल्यानंतर विमानाची सविस्तर तपासणी करण्यात आली का, प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले का आणि विमानाचे मुंबईकडे उड्डाण झाले की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
तसेच, धमकीचा मेसेजकोणी लिहिला आणि तो विमानाच्या स्वच्छतागृहात कधी लिहिण्यात आला, याचाही तपास होणे आवश्यक आहे. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.